Maharashtra Assembly Session:  राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit News) यांनी विधानभवन परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले आहे. रोहित पवारांनी एकट्याने त्यांच्या कर मतदारसंघासाठी हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कर्जत जामखेडच्या एमआयडीच्या मुद्द्यावरुन रोहित पवारांनी हे आंदोलन केले आहे. एमआयडीसीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी रोहित पवारांनी हे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. 


मागील अनेक दिवसांपासून रोहित पवार या मुद्द्याचा पाठपुरवठा करत असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वांचे लक्ष या मुद्द्याकडे वेधण्यासाठी रोहित पवारांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. विधानभवनाच्या प्रांगणातच रोहित पवारांनी त्यांच्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवारांची भेट देखील घेतली. यावेळी गिरीश महाजन यांनी हा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच जोपर्यंत या प्रश्नावर कोणतीही अधिसूचना निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याची भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. 


 रोहित पवारांनी सभागृहात येऊन त्यांचा मुद्दा मांडवा - विधानसभा अध्यक्ष 


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रोहित पवारांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी सभागृहाने एकमताने पुतळ्याजवळ आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता, असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं. त्यामुळे रोहित पवारांनी तिथे आंदोलन करणं योग्य नसल्याचं मत विधानसभा अध्यक्षांनी मांडलं. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि सभागृहाने रोहित पवारांची समजूत घालून त्यांनी सभागृहात आणावे असं देखील त्यांनी म्हटलं. तर रोहित पवारांनी त्याचं जे काही म्हणणं आहे, जो काही प्रश्न आहे तो सभागृहात येऊन मांडावा असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. 


असं आंदोलन करणं योग्य नाही - अजित पवार


यावर बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की हे असं आंदोलन करणं योग्य नाही. दरम्यान या मुद्द्यावर उदय सांमत यांनी दिलेल्या पत्राचे वाचन केले आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, जर संबंधित मंत्र्यांनी याबाबत पत्र लिहून जर काही आश्वासन दिले असेल तर लोकप्रतिनिधींनी देखील त्याची दखल घ्यायला हवी. आता अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यावर चर्चा केली जाईल. पण अशाप्रकारे आंदोलन करणं योग्य नाही. 


त्यामुळे रोहित पवारांच्या या आंदोलनाच्या मुद्द्यावर विधीमंडळात काही तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी सांगितल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या मुद्द्यानंतर रोहित पवार हे आंदोलन मागे घेणार का हे पाहणं देखील गरजेचं आहे. 


हे ही वाचा :


अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेत अस्वस्थता वाढली, समन्वय समितीसमोर गाऱ्हाणं मांडणार : सूत्र