अमरावती : अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन आणखी सात दिवसांसाठी वाढवला आहे. लॉकडाऊनमध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली नसल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. 22 फेब्रुवारी रात्रीपासून 1 मार्चपर्यंत लॉकडाऊनचा पहिला टप्पा होता. परंतु हा टप्पा पूर्ण होण्याच्या आधीच लॉकडाऊनचा कालावधी आणखी सात दिवसांनी वाढवण्यात आला आहे.


अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा प्रकोप काही थांबला नाही. लॉकडाऊन काळात पाच दिवसात तब्बल 4061 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर 32 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आता अमरावती शहर, अचलपूर शहर आणि अंजनगाव सूर्जी शहरातही 8 मार्च सकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल.


दरम्यान, अमरावतीमध्ये लॉकडाऊन असतानाही इतके रुग्ण सापडलेच कसे हाच प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या त्रिसूत्रीचा कार्यक्रम अमरावतीकर पाळत नाहीत का, की जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका कमी पडतेय हा प्रश्न विचारला जात आहे. त्यात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पोलिसांनी अनेक जणांवर कारवाई करुन लाखो रुपयांचा दंड वसूल केला तर अनेकांवर गुन्हेही दाखल केले. मात्र विनाकारण आणि किरकोळ कामासाठी फिरणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही.


त्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. त्यानंतरही लॉकडाऊन वाढवून घ्यायचा नसेल तर त्रिसूत्रीचा वापर करा आणि लॉकडाऊन टाळा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


या काळात आधीप्रमाणेच जीवनावश्यक वस्तू, औषधांची दुकानं सुरु राहतील.