मुंबई : एबीपी माझाच्या मुख्य वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम (Dnyanada Kadam) यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor  Bhagat Singh Koshyari)  यांच्या हस्ते पत्रकारितेतील प्रतिष्ठेचा देवर्षी नारद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  विश्व संवाद केंद्रातर्फे नारद जयंतीनिमित्त दरवर्षी विविध श्रेणींसाठी देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार (Devarshi Narad  Award) प्रदान केले जातात.  ज्ञानदा कदम यांच्याबरोबर  शंतनु दलाल, आकाश नलावडे,  अभिजित चावडा यांनाही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 


पत्रकारितेतील विशेष कामगिरीसाठी ज्ञानदा कदम यांना या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. मुंबईच्या विश्‍व संवाद केंद्राच्या वतीनं नारद जयंतीच्या निमित्तानं गेली 22 वर्षे दिला जाणारा देवर्षी नारद पत्रकारिता आणि समाजमाध्यम पुरस्कार सोहळा राजभवनात संपन्न झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला.


पत्रकार समाजाला आरसा दाखवतात


पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, समाजातात पत्रकारांचे महत्त्व मोठे आहे. पत्रकार हे समाजाला आरसा दाखवतात आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न करतात. देवर्षी नारद हा प्राचीन पत्रकार आहे. चांगल्या पत्रकारितेसह त्यांनी समस्या निवारणाचेही कार्य केले आहे.








यावर्षी प्रथमच देवर्षी नारद समाजमाध्यम पुरस्काराने काही समाजमाध्यमात प्रभावी कामगिरी करणाऱ्यांना देखील गौरविण्यात आले. ट्विटरवर मराठी तरुणांना रोजगार देणारे शंतनु दलाल, गडकिल्ल्यांचा इतिहास इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पोहोचवणारे आकाश नलावडे, भारतीय इतिहासावर संशोधन करणारे युट्यूबर अभिजित चावडा यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.  


 


भारतीय इतिहास, परंपरा, नैसर्गिक आणि मानवी आश्चर्य या विषयांची रंजक माहिती फेसबुकच्या माध्यमातून पोहोचविणारे अभिराज राजाध्यक्ष आणि नियती माविनकुरे यांना देवर्षी नारद समाजमाध्यम पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानधन, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होतं.