Maharashtar Weather : आजपासून राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. राज्यातील काही भागात उन्हाचा चटका जाणवत आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,18 ऑक्टोबर म्हणजे आजपासून राज्यातील ढगाळ वातावरण निवळून ऑक्टोबर हिटचा परिणाम पूर्ववत जाणवणार आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षीची ऑक्टोबर हिट महाराष्ट्रात अधिक दाहक जाणवण्याची शक्यता खुळे यांनी वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात पावसाची शक्यता कमी असल्याचे खुळे म्हणाले. 


संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा दुपारचे कमाल तापमान 2 डिग्रीने तर पहाटेचे किमान तापमान 3 ते 4 डिग्रीने अधिक असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मराठवाड्यात ऑक्टोबर हिटचा परिणाम अधिक असण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, अरबी समुद्रात केरळ राज्यातील कोचीन-अल्लेप्पी अक्षवृत्तच्या दरम्यान पण लक्षद्विप बेटांच्याही अति पश्चिमेकडे आज तयार झालेले कमी दाब क्षेत्र एका आठवड्यात म्हणजे 26 ऑक्टोबर नंतर पुढील पायऱ्यांमध्ये विकसित होणार आहे. कमी दाबाचे क्षेत्र ओमानच्या दिशेने निघून जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर पावसासाठी त्याचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.


25  तारखेपर्यंत महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा परिणाम कायम 


बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या कोलोम्बो शहराच्या अक्षवृत्तावर पश्चिमेकडे दक्षिण ब्रम्हदेशाच्या पश्चिम किनारपट्टीवर आज तयार झालेली चक्रीय वाऱ्याची स्थितीचे रुपांतर 21 ऑक्टोबरला कमी दाब क्षेत्रात रूपांतर होणार आहे. त्यानंतर पुढील पायऱ्यांमध्ये विकसित होवून दक्षिण बांगलादेशच्या दिशेनं निघून जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर पावसासाठी कोणताही परिणाम होण्याची शक्यता नसल्याची माहिती खुळे यांनी दिलीय. माणिकराव खुळे यांनी ऑक्टोबर 25 पर्यंत महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा परिणाम कायम असण्याची शक्यता वर्तवली आहे. 


 पूर्व आणि ईशान्य भारतातून मान्सूनची माघार


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण पूर्व आणि ईशान्य भारतातून मान्सून माघारी परतला आहे. आंध्र प्रदेशचे आणखी काही भाग आणि तेलंगणाचे उर्वरित भागातूनही मान्सूनने माघार घेतली आहे. मंगळवारी नैऋत्य मान्सूनने बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि उर्वरित भागांतून माघार घेतली आहे. सिक्कीम, संपूर्ण ईशान्य भारत, उत्तर बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग, बंगाल आणि आंध्र प्रदेशातून मान्सून माघारी परतला आहे.  दरम्यान केरळमध्ये गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पाणी साचलं होतं. तिरुअनंतपुरममध्येही पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील अनेक भागात पाणी साचल्याने संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नागरिकांनी योग्य ती खबदारी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra weather : दिलासादायक! पुढील तीन दिवस राज्याच्या 'या' भागात पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज