नवी दिल्ली : निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणल्याच्या प्रकरणावर राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. एका पत्रकारद्वारे त्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका जाहीर मांडली आहे.


"मी निवडणुक आयोगावर कुठलाही दबाव आणलेला नाही. उमेदवार मोटवाणी ह्यांनी मला विनंती केली की मला कॉँग्रेस कडून निवडणूक लढवायची नसून मला अपक्ष म्हणून आपल्या कपबशी हया चिन्हावर लढायचे आहे. तेव्हा मी फक्त निवडणुक निर्णय अधिकारी यांना विनंती केली. माझा निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर पूर्ण विश्वास असून ते निर्णय घेण्यास समर्थ आहेत.", असे महादेव जानकर यांनी स्पष्टीकरण दिले.

जानकर यांचं स्पष्टीकरण जसंच्या तसं :

"मी कुठल्याही प्रस्थापित राजकीय कुटुंबातून आलेलो नाही. मी स्वत:ला झिजवत स्वकतृत्वातून वर आलेला सामान्य कार्यकर्ता आहे. जो सामान्य माणसाच्या हक्कासाठी समर्पित आहे. मला फक्त राजकीय डावपेच कळत नाही. तरीही मी निवडणूक आयोगावर कुठलाही दबाव आणलेला नाही. उमेदवार श्री. मोटवाणी ह्यांनी मला विनंती केली की मला कॉँग्रेसकडून निवडणूक लढवायची नसून मला अपक्ष म्हणून आपल्या कपबशी हया चिन्हावर लढायचे आहे. तेव्हा मी फक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांना विनंती केली. माझा निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर पूर्ण विश्वास असून ते निर्णय घेण्यास समर्थ आहेत."

निवडणूक आयोगाच्या नोटिशीनंतर जानकरांचं स्पष्टीकरण

देसाईगंज नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालेलं वृत्त आणि काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीनंतर नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर अखेर महादेव जानकर यांनी स्पष्टीकरण दिले.

काय आहे प्रकरण?

महादेव जानकर यांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जानकर प्रशाकीय अधिकाऱ्याला विरोधकांचे अर्ज बाद करण्याचा सल्ला देत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिकेसाठी येत्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. याठिकाणी आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला कपबशी हेच चिन्ह द्या, अशी मागणी महादेव जानकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसचा अर्ज आल्यास तो बाद करा, असंही जानकर बोलल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतं आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ :