नवी मुंबई : महाड येथील इमारत दुर्घटनेत 35 लोकांचा जीव वाचवणाऱ्या नावेदवर उपचारासाठी दयायाचना करण्याची वेळ आली आहे. इमारत दुर्घटनेत नावेदने 35 जणांना बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला होता. मात्र यावेळी अचानक त्याच्या दोन्ही पायावर स्लँब कोसळल्याने त्याच्यावर पाय गमावण्याची वेळ आली आहे. एकीकडे पाय नाहीत तर दुसरीकडे उपचारासाठी 13 लाख रूपये आणायचे कुठून असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला आहे.


रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तारीख गार्डन इमारत अचानक कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. फक्त सहा वर्ष जुनी इमारत पडल्याने 16 लोकांचा यात जीव गेला. तर अनेक जण जखमी झाले होते. हे होत असताना अनेकांचा जीव वाचवण्यासाठी देवासारखा धावून आला होता नावेद दुस्ते. समोरच्या इमारतीत राहणाऱ्या नावेदला इमारत कोसळत असल्याची शंका येताच त्याने इमारतीमधील लोकांना बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी लावली. 35 जणांना नावेदने इमारतीमधून बाहेर काढलं. मात्र एका वृद्ध महिलेला बाहेर काढताना इमारत कोसळल्याने नावेद गंभीर जखमी झाला.


नावेदच्या दोन्ही पायावर भलामोठा स्लॅब पडल्याने जखमी झालेल्या नावेदला उपचारासाठी नवी मुंबईतील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा उजवा पाय गुडघ्याच्या खालून काढावा लागला. तर डाव्या पायात रॉड टाकण्यात येणार आहेत. उपचारापोटी 13 लाखांपर्यंत खर्च येणार असून तो भरायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातील एकूलता एक कमावणाऱ्या नावेदसमोर जीवमरणाचा प्रश्न निर्माण झाल्याने आईच्या डोळ्यातील आश्रू थांबेनासे झाले आहेत.


नावेदला दोन्ही पाय गमवावे लागल्याने पुढील आयुष्यात काम करता येणे मुश्किल होणार आहे. उपचारासाठी 13 लाखांचा खर्च आला असल्याने समाजातील दानशूर व्यक्तीने पुढे यावे. 35 लोकांचा जीव वाचविणाऱ्या नावेदच्या पाठिशी सरकारने उभे राहून त्याच्या उपचाराचा खर्च द्यावा अशी मागणी नातेवाईक आणि रेस्कू टीमकडून करण्यात आली आहे. त्याच बरोबर त्याला सरकारी नोकरी द्यावी अशीही मागणी होत आहे.


Mahad tragedy | स्पेशल रिपोर्ट | महाड दुर्घटनेत आयुष्यभराची कमाई गेलेल्या कुटुंबाची कहाणी