मुंबई : राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचा तिढा कायम असतानाच लोकसभेची निवडणूक (Loksabha Election 2024) मात्र जाहीर झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक आता जाहीर झाल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमधील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आला आहे. आज (17 मार्च) इंडिया आघाडीकडून मुंबईमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे.


यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची शेवट आज मुंबईमध्ये होत असून शिवाजी पार्कमध्ये भव्य सभा होणार आहे. या सभेसाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी राज्यातील महाविकास आघाडीमधील सर्वच नेते उपस्थित राहणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा या सभेसाठी निमंत्रण देण्यात आलं असून त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं आहे. 


महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात फुटणार 


काँग्रेसकडून काँग्रेस नेते राहुल गांधी प्रियांका गांधी, सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या सभेसाठी उपस्थित असतील. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे सुद्धा या सभेसाठी उपस्थित असणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सभेसाठी उपस्थित असतील. त्यामुळे एक प्रकारे महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ मुंबईतील शिवाजी पार्क मैदानातून फोडला जाईल. 


वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये येणार की नाही?


तत्पूर्वी, काल सुद्धा राजकीय घडामोडींचा दिवस ठरला. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये येणार की नाही? याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. वंचित आघाडीकडून आलेल्या अटी आणि शर्ती आणि बदलणाऱ्या भुमिकेमुळे महाविकास आघाडी हैराण होऊन गेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काल शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये मात्र वंचितच्या भूमिकेवर महाविकास आघाडीकडून एकमत करण्यात आलं आहे. नेहरू सेंटरला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यातील नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह जयंत पाटील अशोक गेहलोत, रमेश चेन्निथला पोहोचले होते. 


काल संध्याकाळी (16 मार्च) शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. ही बैठक लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर होत असल्याने या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं. त्यामुळे या बैठकीमध्ये जागावाटपातील अंतिम फॉर्म्युल्यावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना कोणताही नवीन प्रस्ताव दिला जाणार नाही, यावर महाविकास आघाडीकडून एकमत करण्यात आले. 


राहुल गांधी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करणार 


दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप सुद्धा मुंबईमध्येच होत असल्याने याची सुद्धा चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली. आज होत असलेल्या या समारोपाच्या सभेमध्ये राजकीय नेते काय बोलतात? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. दुसरीकडे शिवाजी पार्कवर ही सभा होत असल्याने राहुल गांधी प्रथम बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते शिवाजी पार्क मैदानावरील सभेकडे प्रस्थान करतील. या सभेमध्ये इंडिया आघाडीतील नेते काय बोलणार? याकडे सुद्धा अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या