Lumpy Skin Disease : सध्या राज्यातील पशुपालक चिंतेत आहेत. कारण, जनावरांवर लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील जवळपास 27 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे.  आत्तापर्यंत 3 हजार 291 जनावरे औषधोपचारामुळं ठिक झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह (Sachindra Pratap Singh) यांनी दिली आहे. आज (20 सप्टेंबर) 25 लाख लसमात्रा प्राप्त होणार असल्याचेही  सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले.


27  जिल्ह्यांमधील 1 हजार 108 गावांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव


राज्यातील पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या सूचना, मनुष्यबळ वाढ, पुरेशा लसमात्रा, पशुधनावर करण्यात आलेले उपचार आयामुळं राज्यातील लम्‍पी आजार आटोक्यात येत असल्याचे सिंह म्हणाले. 
राज्यातील जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली व रायगड अशा 27  जिल्ह्यांमधील 1 हजार 108 गावांमध्ये 9 हजार 375 जनावरांमध्ये लम्‍पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या बाधितांपैकी 3 हजार 291 जनावरे बरी झाली असून, उर्वरित जनावरांव उपचार सुरु असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितलं.


16.45 लाख जनावरांना लसीकरण


राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 49. 83 लाख लसीच्या मात्रा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या लस मात्रांपैकी बाधित क्षेत्राच्या 5 कि.मी. परिघातील 1 हजार 108 गावातील 16.45 लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले असल्याचे आयुक्त सिंह म्हणाले. सध्या वेगानं लसीकरण मोहिम सुरु आहे. प्राधान्याने गोशाळा आणि मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान आज (20 सप्टेंबर) 25 लाख लसमात्रा प्राप्त होणार आहेत. बाधित जिल्ह्यातील जळगांव 94, अहमदनगर 30, धुळे 9, अकोला 46, पुणे 22, लातूर 3, औरंगाबाद 5, सातारा 12, बुलडाणा 13, अमरावती 17, कोल्हापूर 9, सांगली 2, वाशिम 1, जालना 1, ठाणे 3, नागपूर 3 व रायगड 1 अशा एकूण 271 जनावरांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती देखील सिंह यांनी दिली. 


मुंबईतही जनावरांची ने आण करण्यास निर्बंध


राज्यासह देशात अनेक ठिकाणी लम्‍पी आजार जनावरांमध्ये वेगाने फैलावत असल्याने मुंबईतही सावधगिरी बाळगली जात आहे. मुंबईत बैलगाड्या, घोडागाडी तसेच अनेक ठिकाणी गायीदेखील पाळल्या जातात. हे लक्षात घेता मुंबईत लम्‍पीचा फैलाव टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रदर्शन, जत्रा तसेच गर्दीच्या ठिकाणी प्राण्यांची ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. निर्देशांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार, असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.          


महत्त्वाच्या बातम्या: