Lokmanya Tilak national Award : यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना (narendra modi) जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळकांचे पणतू आणि काँग्रेसचे नेते असलेल्या रोहित टिळकांनी मोदींनी हा पुरस्कार स्विकारावा यासाठी शरद पवारांनी मोदींशी बोलावं, अशी शरद पवारांना (Sharad pawar) गळ घातली. पवारांनी संपर्क साधल्यानंतर मोदींनी पुरस्कार स्वीकारायचं ठरवलं. एकीकडे पुरस्कारासाठीचे हे सोपस्कर सुरु असतानाच दुसरीकडे राज्यात राजकीय उलथापालथ घडवण्याच्या हालचाली पडद्यामागून सुरु होत्या. आता या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी राज्याचं हे बदललेलं राजकीय चित्र 1 ऑगस्टला मंचावर पाहायला मिळणार आहे. 



27 जूनला भोपाळमधील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर तपास यंत्रणांच्या चौकशीने मेटाकुटीला आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपसोबत युती करून सत्तेत सहभागी व्हायचं नक्की केलं आणि त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली. एकीकडे पडद्याआडून हे घडत असताना पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त असलेल्या काँग्रेस नेते रोहित टिळक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यासाठी शरद पवारांशी भेट घेतली होती. शरद पवारांनी नरेंद्र मोदींशी बोलावं आणि त्यांना हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी राजी करावं, अशी गळ रोहित टिळकांनी शरद पवारांना घातली. शरद पवार त्यानंतर नरेंद्र मोदींशी बोलले आणि त्यानंतर मोदींनी हा पुरस्कार स्वीकारायचं ठरवलं. शरद पवारांनी 29 जूनला स्वतः पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 


शरद पवारांनी मोदींना हा पुरस्कार देणार असल्याचं जाहीर झालं आणि तीनच दिवसांत म्हणजे 2 जुलैला राष्ट्रवादी फुटली. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे बडे नेते सरकारमध्ये सहभागी झाले. या भूकंपामुळे राज्यातील राजकीय चित्र बदललं. सुरुवातीला केलेल्या योजनाप्रमाणे शरद पवार प्रमुख पाहुणे असलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुरस्कार देताना राज्याचे मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील असं ठरलं. टिळक ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती अपेक्षित होती. मात्र राज्यात घडलेल्या राजकीय भूकंपामुळं अजित पवार यांना देखील उपमुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्याची वेळ आयोजकांवर आली. त्यामुळं 1 ऑगस्टला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी अजित पवारांनी उपस्थित राहावं, म्हणून रोहित टिळकांनी अजित पवारांची भेट घेतली. 


त्यामुळं 1 ऑगस्टला टिळक महाराष्ट्र विद्यापीठात होणाऱ्या या कार्यक्रमावेळी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्कारार्थी, शरद पवार प्रमुख पाहुणे, सुशीलकुमार शिंदे विश्वस्त तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री बाजूला असं चित्र पाहायला मिळणार आहे. पुरस्काराच्या आयोजकांनी केलेल्या दाव्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थ नेतृत्वाखाली "आत्मनिर्भर भारत" या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली. देशवासियांसाठी त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून जागतिक पटलावर भारताला महत्वाचे स्थान मिळवून दिले हे कार्य अधोरेखित करण्यासाठी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणार आहे . 


रोहित टिळक आणि सुशीलकुमार शिंदे विश्वस्त असलेल्या ट्रस्टने शरद पवारांच्या पुढाकाराने हा पुरस्कार नरेंद्र मोदींना द्यायचा निर्णय घेतलेला असताना काँग्रेसमधून मात्र नाराजीचा सूर उमटला आहे. पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून मोदींना हा पुरस्कार देण्यास विरोध दर्शवला आहे. 


आतापर्यंत 40 दिग्गजांना पुरस्कार प्रदान


1983 पासून लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो . आतापर्यंत वेगवगेळ्या क्षेत्रातील 40  व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ज्यामध्ये इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग प्रणव मुखर्जी, बाळासाहेब देवरस, शरद पवार, शंकर दयाळ शर्मा अशा राजकीय व्यक्तींचा तर डॉ. माधवन नायर, प्राध्यापक एम एस स्वामिनाथन अशा शास्त्रज्ञांचा तर राहुल बजाज, बाबा कल्याणी अशा उद्योगपतींचा समावेश आहे. मात्र यावेळचा पुरस्कार राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरणार आहे .