मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यातं आलं. राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 24 तास बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी तसंच एसआरपीएफ जवानांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत राज्यभरात ठिकठिकाणी पथसंचलन केलं. कोरोनाची व्याप्ती गांभीर्याने आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसंच जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली सतत रस्त्यावर येऊ नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं. यावेळी नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षाव करत आभार मानले. पाहूया पोलिसांनी राज्यात कुठे कुठे पथसंचलन केलं.


बुलडाणा - बुलडाण्यात आज तीन नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यात शेगावमधील दोघांचा समावेश आहेत. त्यामुळे आता शेगाव शहरात रुग्णाची संख्या तीन वर गेली आहे. ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत तो भाग पूर्ण तीन किलोमीटरपर्यंत सील करण्यात आला आहे. शेगाव शहरात रुग्णांची संख्या तीनवर गेल्यानंतर शहरात पोलीस प्रशासनातर्फे पथसंचलन करण्यात आलं. यावेळी संपूर्ण शहरातून पथसंचलन करणाऱ्या पोलिसांवर नागरिकांनी फुलांचा वर्षाव केला.


परभणी - कोरोनाच्या काळातही 24 तास सर्वसामान्य नागरिकांसाठी तत्पर असलेल्या पोलिसांवर परभणीच्या जिंतुरमधील नागरिक, व्यापाऱ्यांनी पुष्पवृष्टी केली. जिंतुर शहरातून आज पोलिसांनी पथसंचलन केलं. यावेळी नागरिक, व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून रस्त्यावरुन जाणाऱ्या पोलिसांवर विविध फुलांची वृष्टी केलीय. शिवाय जिंतूरमध्ये व्यापारी, भाजी विक्रेते आणि नागरिकांमध्ये योग्य समन्वय, कोरोनाबाबत सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करायला लावणाऱ्या जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचाही नागरिकांनी सत्कार केला.


हिंगोली - हिंगोलीचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोणाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरामध्ये हिंगोली पोलिसांनी पथसंचलन करण्यात आलं आहे. पथसंचलनाला शहर पोलीस स्टेशनपासून सुरुवात झाली. शहरातील मच्छी मार्केट, तलाब कट्टा, मोची गल्ली, गांधी चौक, इंदिरा चौक, वंजार वाडा या मुख्य गल्ल्यांमधून पथसंचलन पार पडले. संचारबंदीच्या काळात नागरिकांना शिस्त लागावी, नागरिकांनी घरातच बसावे, कायद्याचे पालन करावे. तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत, असं पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. पोलीस उपअधीक्षक यशवंत काळे, डीवायएसपी रामेश्वर व्यंजने यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग या पथसंचालकांमध्ये होता.


यवतमाळ - यवतमाळ पोलीस दलाने आज शहरातून राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडीसह पथसंचलन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रुट मार्च केला. यावेळी शहरातील कलंब चौक भागात मुस्लीम बांधवांकडून पथसंचलन करणाऱ्या पोलिसांवर पुष्पवृष्टी करुन स्वागत केले.


बेळगाव - नागरिकांनी लॉकडाऊनचे गांभीर्याने पालन करावं, असं आवाहन करण्यासाठी पोलिसांनी खानापूरमध्ये पथसंचलन केलं. वारंवार सूचना करूनही नागरिकांकडून संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने शहराच्या सामाजिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. यासाठी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता पोलिसांकडून 100 टक्के लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबत पूर्वसूचना देण्यासाठी खानापूर पोलिसांनी आज शहरातून पथसंचलन करून जागृती केली.


नंदुरबार - संचारबंदी आणि लॉकडाऊन त्यातच येत्या काळात विविध सण आणि उत्सव असल्यामुळे कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने आज शहरात पथसंचलन केलं. या पथसंचलनात राज्य राखीव पोलीस दल आणि जिल्हा पोलीस दलाचे जवान सहभागी झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवत या पथसंचलनमध्ये जवान सहभागी झाले होते. या पथसंचलनाचं नेतृत्त्व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले. एकूणच पोलिसांनी जनतेला संचारबंदी काळात बाहेर न पडण्याचे आवाहन केले. त्याच सोबत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस दल सज्ज असल्याचा इशारा पोलीस दलाच्या वतीने दण्यात आला आहे.


Coronavirus Update | राज्यातील मोठ्या शहरांमधील कोरोनाची स्थिती काय?