उस्मानाबाद : संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या दीडशे एकर जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरत असल्याचे उघड झाले आहे. तशी तक्रार भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी देण्यात आली आहे. ही जमीन मलिक यांनी आपल्या पत्नी आणि मुलांच्या नावे 2014 मध्ये खरेदी केलेली आहे.


उस्मानाबाद तालुक्यातील जवळा दुमाला येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोरोनाचे नियम डावलून शेळी आणि बोकडाचा बाजार भरत असल्याचा प्रकार उघड झाला. हा बाजार मागील तीन ते चार आठवड्यापासून भरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले . बाजारात शेकडो विक्रेते, खरेदीदार, शेळ्या, मेंढ्या, बोकडे तसेच 50 ते 70 च्या जवळपास छोटी, मोठी वाहने जिल्ह्यातील तसेच पर जिल्ह्यातून येत रात्रीच्या अंधारात येत होती. तिथे हा बाजार भरवला जात होता. 


बाजार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ढोकी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. रात्री बारा ते चार दरम्यान हा बाजार भरवला जातो. तो गावापासून चार किमी अंतरावर बाजार होत असल्याने गावात कुणालाही माहीत होत नाही. त्याचे व्हिडिओ पण व्हायरल झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत त्या ठिकाणाच्या जमलेली वाहने आणि जमाव पांगवला. 


बाजार भरवणारे तसेच अन्य कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. याचे कारण मंत्री नबाब मलिक यांचा दबाव असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला आहे.