Bala Nandgaonkar: मराठी विजयोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मनोमिलन झाल्याने शिवसैनिकांसह मनसैनिकांमध्ये सुद्धा उत्साह संचारला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठी शक्ती एकत्रित आली असून मराठी जणांमध्ये जी भावना गेल्या 20 वर्षांपासून व्यक्त केली जात होती ती भावना पुन्हा एकदा चर्चिली जात आहे. ज्या मराठी मेळाव्यामध्ये त्यांनी एकीची वज्रमूठ दाखवून दिली तीच एकीची वज्रमूठ या महाराष्ट्रामध्ये कायम राहावी आणि दोन बंधूंनी एकत्रितपणे आगामी निवडणुकींचा आणि राजकीय आव्हानांचा मुकाबला करावा अशीच प्रतिक्रिया अवघ्या महाराष्ट्रातून येत आहे. जेव्हा दोन बंधू एकत्रित भेटले तेव्हा अवघा महाराष्ट्र स्तब्ध झाला होता. हा क्षण येऊ दे यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक म्हणजे मनसे नेते बाळा नांदगावकर यांचाही समावेश आहे. त्यांनी अनेकवेळा बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलेले अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत. काल सुद्धा दोन भाऊ एकत्र आल्यानंतर त्यांच्या भावना दाटून आल्या.
जीवनात ही घडी अशीच राहू दे
दरम्यान, आज (6 जुलै) बाळा नांदगावकर यांनी फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी म्हटलं आहे की याचसाठी केला होता अट्टाहास असं म्हणत त्यांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये व्यक्त केल्या. त्यांनी ठाकरे कुटुंबांचा एकत्रित फोटो शेअर करतानाच आपली मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, याचसाठी केला होता अट्टाहास. गेली 2 दशके ज्या सुवर्ण क्षणाची वाट बघत होतो तो आज आला आणि कायमचा मनात घर करून गेला. मा. बाळासाहेब आज जिथे असतील तिथून अतिशय आनंदाने बघत असतील. राजकीय इच्छा आणि महत्त्वाकांक्षेच्या पलिकडे जाऊन मी हाच विचार घेऊन वाटचाल करत राहिलो की ठाकरे एकत्र दिसावे आणि आज मी याची देहा याची डोळा हे बघून सगळ्यात आनंदी झालो. त्यात आज आषाढी सारखा अतिशय पवित्र दिवशी हा आनंद द्विगुणित झाला आहे. आता पांडुरंगाकडे एकच मागणे आहे, जीवनात ही घडी अशीच राहू दे.
इतर महत्वाच्या बातम्या