Leopard Terror: राज्यात ठिकठिकाणी होणारे बिबट्याचा वावर मोठ्या चर्चेचा विषय होत असताना अन्नाच्या शोधासाठी मानवी वस्तीत येणाऱ्या बिबट्याची दहशत मोठी आहे. नुकत्याच अहिल्यानगरमधील अकोलेमध्ये आणि चिपळूणच्या तोंडली वालेरी येथे बिबट्याच्या दहशतीच्या व्हायरल व्हिडियोज व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरच्या अकोलेमध्ये कचरा डेपोत अन्नचा शोध घेतानाचा बिबट्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर चिपळूणच्या तोंडली वालेरीमध्ये घराच्या बाजूला कुत्र्याचा आवाज येतोय समजून बाहेर आलेल्या महाजन या व्यक्तीवर काळोखात दडून बसलेल्या बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांमुळे सध्या परिसरात बिबट्याची दहशत आहे. (Leopard Attack)

Continues below advertisement

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, चंद्रपूरात बिबट्याचा वावर वाढला होता. त्यामुळे चिंतेचे वातावरण होते. आता या दोन घटनांचे थरारक व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा बिबट्याचं करायचं काय? असा प्रश्न उभा राहिलाय.

कचऱ्यात अन्नाचा शोध घेणाऱ्या बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल

अकोले तालुक्यातील कोतुळ गावात बिबटे कचरा कुड्यांमध्ये अन्नाचा शोध घेत असल्याचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हे बिबटे प्लास्टिक पिशव्यांमध्ये फेकलेले चिकन-मटण शोधून खात आहेत. रात्रीच्या वेळी गावातील कचऱ्याच्या कुड्यांमध्ये हे बिबटे फिरताना दिसत आहेत. अकोले शहरात देखील कचरा डेपोमध्ये असे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. सामान्यतः भटकी कुत्री कचऱ्यात अन्नाचा शोध घेत असतात, मात्र आता बिबटेही तसाच शोध घेत असल्याचे दिसून आले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला या प्रकाराबाबत माहिती दिली असून, वनविभागाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे. सतत वाढणारी मानव-बिबट्याची टक्कर आणि बिबट्यांचे मानवी वस्त्यांमध्ये होणारे येणे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Continues below advertisement

बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी, झटापटीत बिबट्याचा मृत्यू

चिपळूणच्या तोंडली-वालेरी येथे मध्यरात्री घडलेल्या थरारक घटनेत एका बिबट्याने तरुणावर हल्ला केला. हल्ल्यात आशिष महाजन हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी महाजन यांच्या घराच्या बाहेर कुत्र्यांचा अचानक जोरजोरात आवाज येऊ लागला. आवाजाचा अंदाज घेण्यासाठी ते बाहेर आले असता, दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. अंधारातच दोघांमध्ये तगडी झटापट झाली आणि या झटापटीत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर महाजन रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळले. कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून, तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.