सोलापूर : मराठा आरक्षणाचा लढा घेऊन आता राजकीय मैदानात उतरण्याची तयारी करणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा आजपासून सुरु झाला आहे. सोलापूरमध्ये जरांगे यांच्या स्वागतासाठी लाखो मराठा बांधव एकत्र जमले होते. येथील जाहीर सभेतून जरांगे यांनी मराठा बांधवांना आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Election) आवाहन केलंय. तसेच, भाजप किंवा सत्ताधारी पक्षाची, त्यांच्या नेत्यांची बाजू घेऊन बोलणाऱ्या नेत्यांवरही जोरदार हल्लाबोल केला. माजी केंद्रीयमंत्री नारायण राणेंसह मराठा (Maratha) नेत्यांनाही जरांगेंनी गावरान शब्दात सुनावले.  


जातवान मराठा कधीच कोणत्या पक्षात नाही राहू शकत, कारण जो पक्ष मोठा केला, त्या पक्षाचे नेते आमच्या आरक्षणाविरोधात बोलायला लागले आहेत. मराठा समाजाने हे ओळखलं, आपल्या लेकराला मनोज जरांगे पाटलाला हे उघडं पाडायला लागलेत, त्यामुळे समाज माझ्या पाठीशी आहे. कारण, मी जात मोठी करायला निघालो, लेकरं मोठी करायला निघालोय आणि हे मराठा समाजाचे नेते पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करायला निघाले आहेत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी थेट मराठा नेत्यांवरच हल्लाबोल केला. 


मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, धनगराला आरक्षण द्यायचं नाही, बारा-बलुतेदारांना आरक्षण द्यायचं नाही. मग, याच्याविरुद्ध बोला अस काम सुरूय. आमच्याच, मराठ्यांच्या मतावर माजलेले आमचेच नेते हे बिगर मराठा औलादी असल्यासारखं बोलायला लागले आहेत. आमच्या नेत्याविरुद्ध बोलू नको, अरे नेता काय बाप आहे का तुझा?, तुझा बाप जात आहे, आणि जर तुला तुझा नेता बाप वाटत असेल तर मराठे तुम्हाला मतदान करणार नाहीत. मग, तो भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो..  असे म्हणत मनोज जरांगे यांनी थेट मराठा नेत्यांवरच हल्लाबोल केला. 


फडणवीस तुमचे कधी झाले - जरांगे


नारायण राणे यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे  म्हणाले की, मी कधीच म्हटलो नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका, कधीच म्हटलो नाही की मराठवाड्यात आल्यावर बघून घेऊ. मी माझ्या समाजाचं रक्त सांडून लढतोय. तू काय माझ्या नादी लागू नको, मी तूला दादा म्हणतोय. आम्ही तुमचा सन्मान करतोय, पण पिसाळलो तर अवघड होईल.  आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलायचं नाही. ते तुमचे कधी झाले. तुम्ही सगेसोयरे पण नाही, एका रात्रीत नातं कसं जुळलं. तुमची जात मराठा आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरोधात लढायचं असतं. तुमचा पक्ष नव्हे तर समाज हाच बाप असतो. 


आरक्षण ओबीसीतूनच घेणार


मराठ्यांविरुद्ध बोलणाऱ्यांचा सुफडा साफ करणार, आणि मीही मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटू शकत नाही. आता, एकही मराठा घरात नाही बसू शकत, जातीवान मराठा पक्षात नाही राहू शकत. कारण, त्याल जात मोठी करायची आहे. आम्ही आक्रोश मोर्चा काढणार नाही, दंगल होणार नाही, सगळं शांततेतच होणार. पण, मी आरक्षण ओबीसीतूनच घेणार, असेही जरांगे यांनी म्हटले. 




हेही वाचा


मंत्रिमंडळ निर्णय! महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार; 5 वर्षात 30 हजार कोटींचे उत्पन्न, 5 लाख नोकऱ्या