Laxman Hake: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाचा परिणाम म्हणून शासनाने हैदराबाद गॅझेटियर (Hyderabad Gazetteer) लागू करण्याचा निर्णय घेतला, ज्याअंतर्गत कुणबी मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण देण्यात आले. मात्र, या निर्णयाला ओबीसी नेते आणि संघटना विरोध करत न्यायालयात गेले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयावर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिल्याने याचा फटका आगामी निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला बसणार असून हा राज्यातील ओबीसी नेत्यांना मोठा धक्का आहे. त्यामुळे आता सरकारने तातडीने प्रतिज्ञापत्र सादर करावे अन्यथा निवडणुका लांबवाव्यात अशी भूमिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मांडली आहे. तर हा मनोज जरांगे पाटील यांचा विजय नसून अजून कुठलाही निकाल लागलेला नाही, असा दावाही हाके यांनी केला आहे.
Laxman Hake on Sharad Pawar: पवारांचा मंडल आयोगाशी काही संबंध नाही
1994 साली शरद पवारांनी आमच्या हक्काचं 16 टक्के आरक्षण ओबीसींना दिलं आणि आमचं वाटोळं केलं, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केला. याबाबत विचारले असता लक्ष्मण हाके म्हणाले की, जरांगेला यातलं काही कळत नाही आणि त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते हा योगायोग आहे. वास्तविक पवारांचा मंडल आयोगाशी काही संबंध नाही, अशी टीका त्यांनी केली.
Laxman Hake: ...तर ओबीसी समाजावर अन्याय होईल
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले म्हणाले की, तातडीने प्रतिज्ञापत्र सादर करता येत नसेल तर सुप्रीम कोर्टात पुन्हा निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी याचिका दाखल करा. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय पंचायत राजच्या निवडणुका घेणे समस्त ओबीसी समाजावर अन्यायकारक होईल, असेही त्यांनी म्हटले.
Laxman Hake: लक्ष्मण हाकेंची ओबीसी नेत्यांवर टीका
राज्यातील ओबीसी नेते आता यावर बोलू लागले आहेत. मात्र, मी अडीच वर्षापासून या विरोधात लढत असताना हे नेते मताच्या भीतीने गप्प बसले होते. आता बैल गेला आणि झोपा केला, अशी अवस्था यांची झाल्याची सडकून टीका हाके यांनी ओबीसी नेत्यांवर केली. तुम्ही त्या दहा टक्के मतासाठी भीत होता. आता 60 टक्के ओबीसी एक गठ्ठ्याने केवळ ओबीसीलाच मतदान करेल किंवा अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना मतदान करेल हे लक्षात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला. आपण ज्यांना निवडून दिले त्या सरकारनेही आपले ऐकले नाही आणि न्यायालयाने देखील गडबडीत निकाल दिला. त्यामुळे ओबीसी समाजाने आता जाती-जातीत न भांडता ओबीसी क्लास म्हणून एकत्र या आणि आपली ताकद दाखवून द्या, असे आवाहन देखील हाके यांनी केले आहे.
आणखी वाचा