Rohini Khadse :  लातूरमध्ये (Latur) अखिल भारतीय छावा संघटना (Chava Sanghatana) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना (Sunil Tatkare) निवेदन दिलं. यावेळी त्यांच्या टेबलावर पत्ते फेकण्यात आले. नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात आता काय बघायला मिळणार आहे, याची आता कल्पना करता येत नाही. उद्या उत्तर प्रदेश, बिहारचे लोक म्हणू नये की आमच्या इथे महाराष्ट्रासारखी परिस्थिती नको असेही खडसे म्हणाल्या. 

नेमकं काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

लातूर येथील विश्रामगृहात खासदार सुनिल तटकरे यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी तिथे आले व त्यांनी कृषीमंत्र्यांनी केलेल्या कृतीबाबत तटकरे यांना जाब विचार‌ला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करून दाखवल्या तर अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. असे प्रकार महाराष्ट्रात कधीच पहायला मिळायचे नाही असे खडसे म्हणाल्या. Tom, Dick, Harry च्या कृपेमुळे महाराष्ट्रात आता हे सगळं घडत आहे. मला भीती आहे की उद्या उत्तर प्रदेश, बिहारचे लोक म्हणू नये की आमच्या इथे महाराष्ट्रासारखी परिस्थिती नको अशी टीका देखील त्यांनी केली. 

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपताच त्यांना निवेदन दिलं. माजी मंत्री संजय बनसोडे देखील तिथं उपस्थित होते. यावेळी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. याच वेळी टेबलवर पत्ते देखील फेकण्यात आले. यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं.

सुनील तटकरे हे आज लातूर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले. सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही याबाबत निवेदन अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांना  दिलं.निवेदन देत असतानाच त्यांच्यासमोर पत्ते टाकण्यात आले. गेम खेळायचा असेल तर घरी खेळा... असं सांगत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

महत्वाच्या बातम्या:

Suraj Chavan VIDEO : सत्तेत आहोत म्हणजे सगळं काही चुकीचंच करतोय असं नाही; कार्यकर्त्याला बुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर दादांच्या पक्षाचे सूरज चव्हाण काय म्हणाले?