Aurangabad NCP Protest : कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सत्तार यांच्या औरंगाबादमधील निवास्थानासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घरावर दगडफेक देखील केली.  अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबाद मधील दिल्ली गेट परिसरातील घरावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यावेळी सात्तार यांच्या घराच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला. या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांची वैयक्तिक रित्या माफी मागावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता घटनास्थळी दाखल झाले आहेत.  


राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला सुरुवात झालीय. सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत गलिच्छ शब्द वापरल्यानं राज्यभर संतापाची लाट उसळलीय. सुप्रिया सुळे यांनी खोक्यावरून केलेली टीका अब्दुल सत्तार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. या टीकेवर प्रतिक्रिया देताना सत्तारांचा तोल गेलाय. दरम्यान अब्दुल सत्तारांनी शिवीगाळ केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. सत्तारांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील बंगल्याबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलंय. 


सत्तार यांच्या औरंगाबादमधील निवास्थानी कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. काही कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घराच्या काचेवर दगडफेक देखील केली. यात निवास्थानीच काच फुटली आहे. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या निवास्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. 


दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबई ठाण्यासह पुणे, नागपूर, बीडमध्ये राष्ट्रवादीची आंदोलन सुरू आहेत. 


 काय म्हणाले होते सत्तार? 
औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र  खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी  अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. याचवेळी 'एबीपी माझा'शी बोलताना विरोधकांवर सत्तार यांनी टीका केली. आम्हाला खोके म्हणणारे लोक भिका*** असल्याचं सत्तार म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांचा देखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला. विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. 


दरम्यान, सत्तार यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे. सत्तार यांच्या वक्तव्याने समस्त महिला वर्गाचाअपमान झाला आहे. त्यामुळे सत्तार यांनी आपले शब्द मागे घ्यावेत अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. अब्दुल सत्तार यांनी 24 तासाच्या आत माफी मागितली नाही तर दिसेल तिथे झोडपून काढू, असा इशारा राष्ट्रवादीनं दिला आहे. यांना 50 खोक्यांची मस्ती आली आहे, यांची मस्ती उतरवली जाईल, असं देखील राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी म्हटलं आहे.  


महत्वाच्या बातम्या


Eknath Shinde On Abdul Sattar: वाचाळवीरांना आवर घालण्यासाठी मुख्यमांत्रीकडून तातडीची बैठक, फोन करुन सत्तारांची कानउघाडणी