Beed: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला .खंडणी अपहरण ते निर्घृण  हत्या प्रकरणात संतोष देशमुखांना संपवताना आरोपींनी आनंदोत्सव साजरा केलेल्या  चित्रफिती समोर आल्या आणि राज्यभरात संतापाची लाट उसळली . 9 डिसेंबरला आपल्या कुटुंबातील करत्या पुरुषाची हत्या झाल्याचे समजताच कुटुंबीयांच्या  आक्रोशाने मस्साजोग हादरले .आपल्या गावातील ग्रामस्थांचे घर पक्के असेल तेव्हाच मी स्वतः घर बांधेन असा संकल्प सरपंच संतोष देशमुख यांचा होता .मात्र शेवटची इच्छा अपूर्णच राहिल्याचे कुटुंबाकडून कळतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना दिलेला पक्क्या घराचा शब्द पाळला आहे .पुढील तीन ते चार महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील देशमुख कुटुंबाचे घर तयार होणार असल्याची माहिती शिंदे गट जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिली .


सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर देशमुख कुटुंबातील सदस्यांना वास्तव्यासाठी पक्के घर देऊ असा शब्द शिवसेना शिंदे गटाने दिला होता .अखेर उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून देशमुख यांच्या घराचे भूमिपूजन पार पडले आहे . श्रीक्षेत्र नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज ,भगवान महाराज यांच्यासह जिल्हाप्रमुख अनिल जगताप सचिन मुळे यांच्या हस्ते संतोष देशमुख कुटुंबीयांच्या घराचे भूमिपूजन पार पडले .


संतोष देशमुख यांच्या हस्तेनंतर कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला .भावाच्या हत्येचा न्याय मागण्यासाठी धनंजय देशमुख यांनी पोलीस ठाणे,प्रशासन यांच्याकडून वारंवार पाठपुरावा करत न्यायाची मागणी लावून धरली .संतोष देशमुख यांच्या हत्येने सारा गाव हळहळला .दरम्यान,देशमुख कुटुंबीयांना वास्तव्यासाठी पक्के घर देण्याचं वचन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं . या कुटुंबाला धीर देण्यासाठी , आणि शासनाचं कर्तव्य म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशमुख कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर त्यांना घर बांधून देणार असल्याचं जाहीर केलं होतं .आता या घराच्या जागेचं भूमिपूजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुखांनी माध्यमांना दिली . देशमुख यांच्या निधनानंतर शिवसेना शिंदे गटाने देशमुख कुटुंबाला शब्द दिला होता. आणि तो शब्द आता पूर्ण करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार महिन्यात देशमुख कुटुंबाचे मसाजोग गावात पक्के घर असणार आहे.  असेही शिंदेगटाकडून सांगण्यात आले आहे.