जळगाव : सार्वजनिक बांधकाम खात्यानं रस्ते दुरुस्तीच्या अनेक डेडलाईन दिलेल्या असल्या तरी राज्यातल्या अनेक भागातले रस्ते अतिशय धोकादायक स्थितीत आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर आणि चोपडा या दोन तालुक्यांच्या सीमेवरचा तापीनदीला जोडणारा पूल अक्षरक्ष: खचण्याच्या मार्गावर आहे.


पुलाच्या दोन्ही बाजूंना तब्बल 15 ते 20 जीवघेणे खड्डे पडले आहेत. पुलाचा भराव पूर्णपणे वाहून अनेक महिने लोटूनही या भागात सार्वजनिक बांधकाम खात्यानं ढुंकूनही पाहिलेलं नाही.

याबाबत स्थानिक लोकांनी तक्रारी देऊनही, त्यांना दाद मिळालेली नाही. या मार्गावरुन एसटीबरोबर, स्कूलबस, खासगी गाड्या आणि मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होते.

रस्ता खड्ड्यांनी भरल्यामुळे चुकूनही कुणाचा तोल गेला, तर या खड्डयांमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथला हा रस्ता या नव्या डेडलाईनमध्ये तरी सुधारावा, अशी माफक अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.