Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची संख्या 26.34 लाख, सरकार काय कारवाई करणार?
Ladki Bahin Yojana : ही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत.

मुंबई : महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नुकतीच एक महत्त्वाची माहिती दिली. राज्यातील तब्बल 26 लाख 34 हजार अपात्र लाडक्या बहिणींचे हप्ते रोखण्यात आल्याचं तटकरेंनी म्हटलं आहे. याशिवाय अनेक पुरुषही 'लाडकी बहीण'चा लाभ घेत होते असंही पडताळणीत उघड झाल्याची कबुली त्यांनी दिली. जाणून घेऊयात काय आहे हे एकूण प्रकरण.
राज्य सरकारसाठी आर्थिक आव्हान ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी सापडण्याचा सिलसिला अजूनही सुरुच आहे. फडणवीस सरकार सत्तेवर येऊन साडेसात महिने होऊनही या योजनेतील घुसखोरीची साडेसाती मात्र संपता संपत नसल्याचं चित्र आहे.
26.34 लाख महिला अपात्र
केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेत पुरुषांनी घुसखोरी करून सरकारी तिजोरीतले कोट्यवधी रुपये लाटल्याची बातमी ताजी असतानाच आता लाखो विद्यमान लाभार्थी महिलांना सरकारनं मोठा धक्का दिलाय. महाराष्ट्रात या योजनेचा लाभ घेणाऱ्यांपैकी 26 लाख 34 हजार अपात्र महिला असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.
जून महिन्यातील हप्ता बंद
जून महिन्यापासून या महिलांना योजनेचा लाभ मिळणं बंद झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे.
यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्यात आला आहे.
लाभार्थ्यांची शहानिशा करणार
अर्थात, या 26 लाख 34 हजार महिलांना मिळणारे योजनेचे पैसे थांबले असले, तरी सर्वच्या सर्व अपात्र लाभार्थी आहेत की नाही, याबाबत सरकार अद्यापही ठाम नाही. या लाभार्थ्यांची शहानिशा केली जाणार असून त्यात काही पात्र लाभार्थी आढळले, तर त्यांचा सन्माननिधी पुन्हा सुरु करण्यात येईल, असं म्हणत सरकारकडून दिलासा देण्याचाही प्रयत्न होतोय.
विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका
या योजनेबाबत सरकारच्या धोरणावर काँग्रेसनं सडकून टीका केली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, "मत मिळवण्यासाठी ही योजना आणली आहे. आणखी शोधले तर खूप मिळतील. लोकांनी यांना हरवलं होतं, ही योजना आणून मत मिळवण्याच्या प्रयत्न या सरकारने केला."
तपासणी सुरूच राहणार
सरकारी आकडेवारीनुसार सध्या सव्वादोन कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यापैकी 26.34 लाख म्हणजेच जवळपास 11 ते 12 टक्के महिला जूनपासून या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. दुसरीकडं या योजनेत घुसलेल्या पुरुषांना शोधण्यातही सरकारला यश आलं आहे. यामुळं सरकारी तिजोरीवर येणारा ताण किमान 12 टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज आहे.
योजनेतील बोगस लाभार्थ्यांची ही साफसफाई भविष्यातही अशीच सुरु राहणार का आणि अपात्र लाभार्थ्यांवर सरकार काय कारवाई करणार, याकडं आता सर्वांचं लक्ष असणार आहे.
ही बातमी वाचा:
























