मुंबई : लाडकी बहीण योजनेसंबंधी (Ladki Bahin Yojana) राज्य सरकारने प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी काही कारणास्तव ई केवायसी (e KYC) प्रक्रिया करताना चुका झाल्या आहेत अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Continues below advertisement

लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ज्यांनी ई केवायसी केली नव्हती त्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु अनेक लाभार्थ्यांची ई केवायसी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा हफ्ताही मिळू शकला नव्हता. 

यासंबंधी अनेक तक्रारी आल्यानंतर आता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Continues below advertisement

आदिती तटकरेंनी नेमकं काय म्हटलंय? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महत्वाची सूचना !

महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. 

तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

वाशिममध्ये लाडक्या बहिणींचे आंदोलन

वाशिम जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणे बंद झाल्याचं चित्र आहे. त्यासंबंधी तक्रार करायला गेलेल्या महिलांचा संताप पहावयास मिळाला. लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नसल्याबाबत तक्रार मांडण्यासाठी मोठ्या संख्येने महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या होत्या. मात्र जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट नाकारण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला. वारंवार विनंती करूनही जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश न मिळाल्याने संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनाला घेराव घालत जोरदार निषेध व्यक्त केला.