मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांची लवकरच 'शट अप यार कुणाल' या पॉडकास्ट मध्ये मुलाखत होणार असल्याचं दोघांनीही ट्विटरवरून जाहीर केलं होतं. या पोस्टचं अनेकांनी स्वागत केलं तर काहींनी ट्रोलही केलं.


आज मुंबईत खारमधल्या एका खासगी स्टुडियोत या मुलाखतीचं चित्रीकरण करण्यात आलं. थोड्याच दिवसात याचं समाज माध्यमांवर प्रक्षेपण होणार आहे. संजय राऊत हे त्यांच्या आक्रमक शैलीतून तर कुणाल कामरा हा त्याच्या उपरोधक कॉमेडीच्या माध्यमातून कायमच मोदी आणि भाजपवर निशाणा साधत असल्यामुळे कायम चर्चेत असतात.


आजच्या या मुलाखतीत कंगना ते अर्णब आणि सुशांत ते कन्हैय्या या सर्व विषयांवर दिलखुलास गप्पा झाल्या आहेत. इतकंच नाही तर मुलाखतीच्या केंद्रस्थानी बुलडोझर हे प्रॉप होते आणि या बुलडोझरला पद्मश्री का दिला पाहिजे यावरही या मुलाखतीतून खुलासा होणार आहे. त्यामुळे दोघांच्या या मुलाखतीबद्दल नेटकऱ्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे.


दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत आपल्या सडेतोड वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. सध्या अभिनेत्री कंगना रनौत मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन संजय राऊतांनी तिच्यावर निशाणा साधला होता. संजय राऊतांनी सामनासाठी घेतलेली राजकीय नेत्यांची मुलाखतीची देशभर चर्चा असते, मग ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची. मात्र यावेळी राऊत मुलाखत घेताना नाही तर मुलाखत देताना दिसतील. संजय राऊत यांची मुलाखत कुणाल कामरा घेतली आहे.



स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने रमित वर्मासह 2017 मध्ये 'शट अप या कुणाल'ची सुरुवात केली होती. या शोमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त पाहुण्यांना निमंत्रण देऊन त्यांच्याशी संवाद साधला जातो. शिवाय काही बातम्यांचे किंवा डिबेट शोमधील व्हिडीओ क्लिप्स, मजेदार व्हिडीओ दाखवून त्याबाबत काही प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या मुलाखतीत संजय राऊत काय बोलणार याची उत्सुकता आहे.कुणाल कामराच्या या शोमध्ये याआधी एनडीटीव्हीचे रवीश कुमार, गीतकार जावेद अख्तर यांसारखे नामवंत व्यक्ती सहभागी झाले होते.