Konkan Rain weather updates: रायगडमध्ये मुसळधार पाऊस, सावित्री नदीचं धडकी भरवणारं रुप, नागरिकांना अलर्ट
रत्नागिरीत रेड अलर्ट होण्याची शक्यता असून ढगफुटीसारखा पाऊसही होऊ शकतो. त्यामुळे रायगड आणि कोकणातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी

Konkan Rain weather updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून तुफान पाऊस कोसळतोय. नद्या, नाले,ओढे दुथडी भरून वाहत आहेत. महाड तालुक्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर रत्नागिरीत ढगफूटीसदृश्य पाऊस होऊ शकतो. परिणामी रत्नागिरीला मंत्री उदय सामंत यांनी धोक्याचा इशारा दिलाय. रत्नागिरीत आज रेड अलर्टही दिला जाऊ शकतो असंही सांगण्यात येत आहे. (Rain Updates)
2021 ची आठवण करणारे दृश्य
सावित्री नदीच्या वाढत्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कारण, 2021 मध्ये याच सावित्री नदीने रौद्ररूप धारण करत महाड शहराला जलमय केलं होतं. त्यावेळी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. यंदाही अशीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासन सज्ज झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठी असलेल्या वसाहतींमध्ये स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फक्त सावित्रीच नव्हे, तर रायगडमधील आंबा आणि कुंडलिका या दोन नद्यांनीही धोका पातळी गाठल्याने आणखी सतर्कतेची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने बचाव पथकं तयार ठेवली असून, पुराचा संभाव्य धोका असलेल्या भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
हवामान खात्याचा इशारा
सध्या काही भागांत पावसाने थोडी उघडझाप घेतली असली तरी पुढील काही तासांत पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित ठिकाणी राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवून प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, “रत्नागिरीत रेड अलर्ट होण्याची शक्यता असून ढगफुटीसारखा पाऊसही होऊ शकतो. त्यामुळे रायगड आणि कोकणातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी.”
महाडमधील नागरिकांना प्रशासनाकडून सतत सूचना दिल्या जात आहेत. महाड शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये बोटींनी मदतकार्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून, स्थानिक पातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास, पुरस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत सूचनांवरच भर द्यावा.
हेही वाचा:
रायगड फिरायला जाताय, हे वाचा; पर्यटकांसाठी किल्ल्याची पायरी वाट बंद, प्रशासनाचा मोठा निर्णय



















