कोल्हापूर : राजर्षि छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न म्हणून सन्मानित करण्यात यावं, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी देशातील सर्व खासदारांना इंग्रजी भाषेतील 'शाहू ग्रंथ' दिवाळीची भेट म्हणून पाठविला आहे. हा 'शाहू ग्रंथ' खासदारांनी वाचून महाराजांचं कार्य समजून घ्यावं आणि या मागणीला पाठिंबा द्यावा यासाठी हे ग्रंथ पाठवले आहेत, असे खासदार धनंजय महाडिक यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी आग्रही मागणी कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी संसदेचे लक्ष वेधले होते. या मागणीचा पाठपुरावा म्हणून खासदार महाडिक यांनी देशातील सर्व खासदारांना राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित गौरवग्रंथ भेट म्हणून पाठवला आहे. देशातील सर्वच खासदारांनी राजर्षि शाहू महाराजांचे चरित्र वाचावे आणि या महान लोकराजाला भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेला 'शाहू ग्रंथ' खासदार धनंजय महाडिक यांनी देशभरातील सर्व खासदारांना पाठवला आहे. हा ग्रंथ वाचल्यानंतर देशभरातील सर्व खासदार, राजर्षि शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहितील आणि त्यातून आपली मागणी पूर्णत्वास जाईल, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे.

समतेचे आणि विकासाचे द्रष्टे राजे असलेल्या राजर्षि शाहू महाराजांना भारतरत्न किताबाने सन्मानित करावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी यापूर्वीच केली आहे. त्यासाठी खासदार महाडिक यांनी संसदेतही हा मुद्दा उपस्थित केला. तर कोल्हापुरातील विविध व्यक्ती, संस्था यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहून,राजर्षि शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत विनंती करावी, असे आवाहन करण्यात आले होते. त्याच्या पुढचा टप्पा आणि पाठपुरावा म्हणून खासदार महाडिक यांनी देशातील सर्व खासदारांना शाहू चरित्रग्रंथ भेट म्हणून पाठवला आहे.