कोल्हापूर : उद्योजकाला मैत्रिचा थोडा-थोडका नाही तर तीन कोटींचा फटका बसला आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या या उद्योजकाकडून त्याच्या मैत्रिणीने आणि तिच्या टोळक्याने तब्बल तीन कोटी 30 लाख रुपये उकळले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात पीडित म्हणून भूमिका बजावणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून अद्याप शोध सुरू आहे.
काय आहे हे प्रकरण?
हे प्रकरण 2019 सालचं आहे. एका कामानिमित्ताने कोल्हापूरचा एक उद्योजक मुंबईत आला होता. मुंबईत एका हॉटेलमध्ये थांबलेल्या कोल्हापुरातील उद्योजकाला या टोळीनं हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवलं. सुरुवातीला त्याच्याकडून तीन कोटी तीस लाख रुपये लाटण्यात आले. नंतर त्याच्याकडून दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली.
हा उद्योजक ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तो थांबला होता तिथे सपना, अनिल आणि मोनिका नावाच्या तिघांशी त्याची ओळख झाली. आपण जाळ्यात फसतोय याची सुतराम कल्पना नसलेला हा व्यापारी क्षणिक मैत्रीच्या गळात अडकत चालला होता. औट घटकेच्या मैत्रीला भुलून व्यापाऱ्यानं या तिघांना आपल्या खोलीत निमंत्रित केलं.
मोनिका, सपना आणि अनिलनं विनयभंगाचा जोरदार कांगावा सुरू केला. या घटनाक्रमात गांगरलेल्या व्यापाऱ्याला काय होतंय याचं आकलन होण्यापूर्वी तो या तिघांच्या कटाला बळी पडला होता. प्रतिष्ठा वाचवण्यासाठी व्यापाऱ्यानं या तिघांचे आदेश मानण्याचं कबूल केलं. इथे सुरू झाली न थांबणारी लूट.
सुरुवातील तीन कोटी 30 लाखांची खंडणी वसूल केल्यानंतर या टोळक्याने त्या उद्योजकाकडून दहा कोटी रुपयांची मागणी केली. आता 10 कोटी रुपये आणायचे कुठून, दिले नाही तर प्रतिष्ठेची माती होणार या उद्विग्नतेतून व्यापाऱ्यानं आत्महत्येचा निर्णय घेतला. मात्र व्यापाऱ्याच्या मुलाच्या ही बाब लक्षात आली आणि त्यानं वडिलांना विश्वासात घेतलं. मुलाच्या मदतीनं घडला प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला. पोलिसांनीही या तिघांना पकडण्यासाठी जाळं टाकलं आणि पैशाला हपापलेले तीघजण पोलीसांच्या जाळ्यात सापडले.
महत्त्वाच्या बातम्या :