Marathwada Flood 2025: वर्षानुवर्षे पाण्यासाठी भटंकती करणाऱ्या मराठवाडा विभागात (Marathwada Flood 2025) झालेल्या विनाशकारी पावसाने भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. अहिल्यानगर, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसाने हाहाकार केला आहे. शेती, घरं, रस्ते, पाणीपुरवठा योजना आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार हजारो कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची पीकं पाण्याखाली गेल्याने उत्पादनावर मोठा फटका बसला आहे, तर पशुधनाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. सोयाबीन, तूर, कापूस आणि मका या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभा राहिलं आहे. 

Continues below advertisement

कोल्हापूरकडून मदतीचा हात 

दरम्यान, महापुराची वेदना 2005 मध्ये तसेच 2019 आणि 2021 असा तीन वर्षात दोनदा महापूर पाहिलेल्या कोल्हापूरनं मदतीसाठी पुरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. व्हाईट आर्मीची तुकडी मदतीसाठी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. मध्यरात्री उत्तर सोलापूर, माढा तालुक्यातील गावामध्ये कोल्हापूरच्या जवानांनी 180 हून अधिक जणांची सूटका केली. दुसरीकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक सुद्धा सोलापूर जिल्ह्यात पोहोचलं आहे. कोल्हापूरच्या जवानांनी शिंगेवाडी (ता. माढा जि. सोलापूर) या गावामधील पुराचे पाण्यात अडकलेल्या 25 नागरिकांची सुखरूप सुटका केली. द्रौपदी लक्ष्मण शिंदे, (वय 64) या लकवा असलेल्या महिलेला सुद्धा सुरक्षित स्थलांतर करण्यात आलं आहे.

सतेज पाटलांकडून मदतीसाठी आवाहन 

दरम्यान, काँग्रेस विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनीही कोल्हापूर महापुराचा अनुभव सांगत मदतीसाठी आवाहन केलं आहे. सतेज पाटील यांनी सोशल मीडियातून मराठवाड्यासाठी मदतीचं आवाहनं केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सध्या मराठवाडा अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जात आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेती, घरे, स्वप्नं आणि भविष्य सगळंच वाहून गेलं आहे. कोल्हापूरकरांनो, आपणही महापुराचा वेदनादायक अनुभव घेतला आहे. महापुराच्या काळात देशभरातून मदतीचा हात मिळाला होता. आज आपली वेळ आहे, ही आपली जबाबदारी आहे. तुमची छोटीशी मदतही पुरग्रस्तांसाठी जीवनरेखा ठरेल. मराठवाडा पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी चला, मदतीचा हात पुढे करूया! आपली मदत आज 24 सप्टेंबरपासून 28 सप्टेंबरपर्यंत जमा करा. 29 तारखेला मदतीचा ट्रक मराठवाड्याकडे रवाना होईल, 

इतर महत्वाच्या बातम्या