कोल्हापुरातील महापुरात यंदा सगळ्यांना उद्ध्वस्त केलं. अनेकांचे संसार उघड्यावर आले. हे संसार सावरण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. याच दरम्यान एक तरुण आपला संसार बुडाला तरी दुसऱ्यांचे संसार सावरत होता. मात्र आज पूर ओसरुन पाच महिने झाले तरी त्याचा संसार उभा राहिलेला नाही. 'एबीपी माझा'ने पुरातील देवदूत म्हणून सचिन भोसले यांना गौरवलं होतं. आता सचिन यांचा संसार दुसऱ्या एखाद्याच्या घरात आहे. आई, पत्नी आणि दोन मुली असा संसार सचिन हाकत आहेत.
कोल्हापुरात 1999 मध्ये व्हाईट आर्मी स्वयंसेवी संस्थेची स्थापना झाली. आपत्तीग्रस्तांना ही संस्था मदत करते. सचिन भोसले हे तेव्हापासून या संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. देशभरातल्या अनेक आपत्कालीन परिस्थितीत सचिन भोसले मदतीसाठी धावून गेले आहेत आणि अनेकांचे जीव वाचवले आहेत. उत्तराखंडचा प्रलय, केरळचा पूर, माळीण गावातील दुर्घटना, तिवरे धरणफुटी ते कोल्हापूरचा महापूर, अशा अनेक आपत्कालीन परिस्थितीमध्ये ते मदतीसाठी धावून गेले होते. पाऊस आणि चोहोबाजूला पाणीच पाणी अशा परिस्थितीत सचिन भोसले आणि व्हाईट आर्मीने सैन्यातील जवानांच्या मदतीने कोल्हापूर, सांगलीत अक्षरक्ष: हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत.
सचिन भोसले यांचा संसार उभा राहावा यासाठी अनेकांनी मदतीचा हात दिला. मात्र आता काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. हे घर सचिन यांच्या नावावर नसल्याने सरकारी मदतही मिळत नाही. त्यामुळेच सचिन यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.