कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसात मुसळधार पाऊस  पडत आहे, काही तालुक्यात अतिवृष्टी होत असून गगनबावडा तालुक्यात  एकाच दिवसात तब्बल 202.50 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


धरणक्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसाने काळमावाडी वगळता सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत. राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे आज पहाटे पावणे सहा वाजता उघडले. त्यातून 12 हजार 200 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु होता. मात्र यापैकी 1 आणि 2 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे पुन्हा 11 वाजता बंद झाले.

त्यामुळे हा विसर्ग कमी होऊन सध्या 8740 इतका विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील इतरही लघु आणि मध्यम स्वरुपाची धरणे भरली असून, त्यातूनही होणाऱ्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत  वाढ होत आहे.

प्रतितास 1 इंच पाणी पातळीत वाढ होत असून महापुराची स्थिती निर्माण व्हायला फक्त 5 इंच पाणी पातळी बाकी आहे. जिल्ह्यातून जाणारे  अनेक राज्य  महामार्ग पाण्याखाली आहेत. प्रामुख्याने गगनबावडा-कोल्हापूर, रत्नागिरी-कोल्हापूर हे कोकणाला जोडणारे मार्ग बंद झाल्याने, या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

तर जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. एकूणच काही तासातच कोल्हापुरात पुन्हा एकदा महापुराची स्थिती निर्माण झाली असून प्रशासन सज्ज झाले आहे.