Kisan Sabha Long March : जोपर्यंत आमच्या मागण्या लेखी स्वरुपात मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची भूमिका किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीनं घेण्यात आली आहे. काल (16 मार्च) मुंबईच्या दिशेने निघालेल्या किसान सभेच्या नेत्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले. मात्र, आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही. त्यामुळं मागण्यासंदर्भात सरकारनं लेखी आदेश काढावा अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे.


... तरच मागे फिरु नाहीतर मुंबईच्या दिशेनं जाऊ


 आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही जर विश्वास असता तर इथे यावेच लागले नसते असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले. सर्व शेतकरी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात दाखल झाले आहेत.  सर्वजण तिथेच थांबले आहेत. सर्व शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाची वाट बघत आहेत. जर मागण्या मान्य झाल्या तरच मागे फिरु नाही तर पुढे जाऊ अशा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, काल रात्री पाऊस पडल्यानं बाजूला बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत काही शेतकरी झोपायला गेले होते. पण अंधार असल्यानं अंदाज न आल्यानं एक महिला शेतकरी पहिल्या मजल्यावरुन खाली पडली. त्या महिलेला दुखापत झाली आहे. तिला पहाटे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.


लाँग मार्च मागे घ्यावा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन 


अखिल भारतीय किसान सभेचे शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल बैठक झाली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दोन ते तीन तासांच्या बैठकीनंतर तोडगा निघाला आहे. काही मागण्या विचारधीन आहेत. जोपर्यंत अंमलबजावणी सुरू होत नाही तोपर्यंत मोर्चा तूर्तास त्याच ठिकाणी मुक्कामी राहणार असल्याचे कॉम्रेड जीवा पांडू गावित यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर शेतकऱ्यांनी लाँग मार्च आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. 
 
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार कॉम्रेड जे. पी. गावित, किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले, माकपचे आमदार विनोद निकोले, किसान सभेचे नेते आणि माकपचे राज्य सचिव कॉम्रेड उदय नारकर, 'सीटू'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल कराड हे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते.


महत्त्वाच्या बातम्या:


लाल वादळ माघारी फिरणार? शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक, पण...