कोल्हापूर : डॉ कृष्णा किरवलेंच्या हत्येची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी कोल्हापुरात जाऊन किरवलेंच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी किरवलेंच्या हत्याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नवा खुलासा

जेष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. डॉ. कृष्णा किरवले हत्याप्रकरणात नवा खुलासा झाला आहे. किरावले यांच्या राहत्या घराच्या व्यवहारावरून किरवले आणि प्रितम पाटील नावाच्या व्यक्तीमध्ये वाद झाला होता. याच व्यवहारातून झालेल्या भांडणामुळे किरवले यांची हत्या झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

काल डॉ. कृष्णा किरवलेंची कोल्हापुरातील म्हाडा कॉलनी परिसरातील राहत्या घरी हत्या झाली होती.  घर विक्री प्रकरणात ठरलेल्या रक्कमेत वाढ करुन देण्याची किरावले यांनी मागणी केली होती. अडव्हान्स म्हणून दिलेली रक्कम परत करण्यासाठी प्रितम पाटीलने किरवलेंकडे तगादा लावला होता. व्यवहारातून झालेल्या भांडणातून किरावलेंची हत्या झाल्याचं उघड झालं आहे.

डॉ. कृष्णा किरवले हे 2012 साली जळगावात पार पडलेल्या 31 व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आंबेडकरी जलसावर त्यांनी ऐतिहासिक संशोधन केले असून, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख होती. डॉ. गंगाधर पानतावणे यांना ते आपले गुरु मानत.

दलित चळवळ आणि साहित्य, समग्र लेखक बाबुराव बागुल अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

शिवाजी विद्यापीठात मराठी विभागाच्या प्रमुखपदाची धुराही त्यांनी काही काळ सांभाळली. आंबेडकरी चळवळीतील ‘थिंक टँक’ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं.