कल्याण: एकीकडे डोंबिवलीतील संदप खदाणीमध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडत असताना दुसरीकडे पालिकेचे अधिकारी हॅपी स्ट्रीट कार्यक्रमात नाचत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावर घडलेली घटना दुर्दैवी मात्र कार्यक्रम आणि त्या दुर्दैवी घटनेचा संबंध जोडणं चुकीचं असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
कपडे धुण्यासाठी संदप खदाणीमध्ये गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना डोंबिवलीमध्ये घडली होती. या घटनेला 24 तासही उलटत नाही तोच दुसरीकडे पालिकेचे अधिकारी हॅपी स्ट्रीट या कार्यक्रमात नाचत असताना, गाणं गात असतानाच व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओवरून भाजपने केडीएमसी विरोधात टीका केली आहे. या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचं भान राखणं अपेक्षित होतं, मात्र आधी जखमा करायच्या नंतर मीठ चोळायचं ही प्रशासनाची सवय असल्याची टीका भाजपचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केली आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी या आरोपांच खंडण केलं. ते म्हणाले की "घडलेली घटना दुर्दैवी होती, मात्र घटनेची माहिती आम्हाला उशिराने मिळाली, आम्ही देखील त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. या भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. घटना घडल्यानंतर तातडीच्या उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आल्या. हॅपी स्ट्रीट हा कार्यक्रम पोलिसांनी आयोजित केला होता. महापालिका त्यात सहभागी होती. नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा आणि त्या घटनेचा संबंध जोडणं हे चुकीचा आहे."
दरम्यान, संदप गावातील खदाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला होता .या दुर्दैवी घटनेनंतर या गावांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येबाबत महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. घटनेच्या तिसऱ्या दिवशी महापालिका अधिकाऱ्यांनी या खदाणीची पाहणी केली. त्यानंतर खदाणीतून पाणी बाहेर काढून सुमारे पाच ते दहा हजार लिटर क्षमतेच्या टाक्यामध्ये पंपिंग करुन भरण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. अमृत पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत होईर्पयत 15 एमएलडी पाणी वाढवून द्यावे अशी मागणी एमआयडीसीकडे करण्यात आली आहे.