मुंबई : 'कौन बनेगा करोडपती'चा 11 वा सीजन वादात अडकला आहे. केबीसीमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्याने सोशल मीडियातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीवर टीकेची झोड उठली आहे. नेटिझन्स या मुद्द्यावरुन अमिताभ बच्चन यांना ट्रोल करत आहेत. तर अमिताभ बच्चन यांनी माफी मागावी, अशी मागणीही नेटिझन्सकडून केली जात आहे.
काय आहे प्रकरण?
गुजरातहून आलेल्या स्पर्धक शाहेदा चंद्रन या अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसल्या होत्या. 'यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?' असा प्रश्न आमिताभ बच्चन यांनी त्यांना विचारला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले.
1. महाराणा प्रताप
2. राणा सांगा
3. महाराजा रणजीत सिंह
4. शिवाजी
या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्यात आला होता. औरंगजेबच्या नावापुढे 'मुघल सम्राट' लावू शकता तर राज्याभिषेक झालेल्या छत्रपतींचा उल्लेख एकेरी का?, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवरायांचा एकेरी उल्लेख पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. ट्विटरवर नेटिझन्स #boycottKBC हा हॅशटॅश सुरु करुन 'कौन बनेगा करोडपती-11' न पाहण्याचं आवाहन करत आहेत.