Karuna Sharma VIDEO : कोर्टाचा निकाल ऐतिहासिक, धनंजय मुंडे यांच्याकडे डोकं नाही, त्यांची आमदारकी घालवूनच शांत बसणार; निकालानंतर करुणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
Karuna Sharma Vs Dhananjay Munde : कोर्टाने सगळ्या महिलांसाठी ऐतिहासिक निकाल दिला असून धनंजय मुंडेंची पहिली बायको आपणच असल्याचं न्यायालयात दुसऱ्यांदा सिद्ध झालं आहे असं करुणा शर्मा म्हणाल्या.

मुंबई : समोर मंत्री असो वा कितीही ताकदवान व्यक्ती असो, आपली बाजू सत्याची असेल तर त्याचा विजय होतोच. न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व पीडित महिलांसाठी ऐतिहासिक असाच आहे अशी पहिली प्रतिक्रिया करुणा शर्मा यांनी दिली. आता धनंजय मुंडेंची आमदारकी घालवूनच शांत बसेन, तो मोठा विजय असेल असंही त्या म्हणाल्या. धनंजय मुंडे यांचे हे डोकं नसून त्यांच्या आजूबाजूच्या दलालांनी आपल्याविरोधात कारस्थान रचल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला. माझगाव कोर्टाने राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली असून करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल दिला आहे.
करुणा शर्मा या आपल्या पत्नी नाहीत असं सांगत आमदार धनंजय मुंडे यांनी वांद्रे कुटुंब न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिलं होतं. त्यावर करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंच अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र हे दोन महत्त्वाचे पुरावे दाखल केले. त्या आधारे न्यायालयाने करुणा शर्मा यांना दिलासा देत त्यांना देण्यात येणारी पोटगी कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे.
प्रत्येक महिलेने लढावं
न्यायालयाच्या निकालानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, "महिलांसाठी हा निकाल ऐतिहासिक आहे. महिला या असा लढा देताना हतबल होतात. मी देखील अनेकदा हतबल झाले, रडले. पण आपली बाजू सत्याची असेल तर आपण लढलं पाहिजे, न्याय मिळतोच. या निकालाने महिलांना एक नवा मार्ग दिसला आहे. अशा अनेक महिला आहेत ज्यांच्यावर अन्याय होत आहे. पण माझ्यासारख्या एका साधारण महिलेने एका मंत्र्याला हरवलं आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने लढावं असं माझं आवाहन आहे."
पहिली बायको असल्याचं दुसऱ्यांदा सिद्ध
करुणा शर्मा म्हणाल्या की, "धनंजय मुंडेंची पहिली बायको मीच आहे हे न्यायालयात दुसऱ्यांदा सिद्ध झालं आहे. 1998 पासून आतापर्यंत 27 वर्षे मी धनंजय मुंडे यांच्यासाठी दिले आहेत. त्यामुळे आता माझा हक्क म्हणून मला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी होती. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारेच हा निकाल देण्यात आला आहे."
धनंजय मुंडेंनी हे प्रकरण दडपण्यासाठी माझ्या मागे काही युवकांना सोडलं होतं. मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी 20 कोटींची ऑफर देण्यात आली आहे. त्याचेही माझ्याकडे पुरावे आहेत असंही करुणा शर्मा म्हणाल्या.
ज्या दिवशी धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईल त्या दिवशी मोठा विजय असेल. पुढच्या सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाणार हे नक्की असा विश्वास यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
धनंजय मुंडे यांच्याकडे एवढं डोकं नाही
दर दिवशी षडयंत्र आपल्याविरोधात षडयंत्र रचण्यात आलं असा आरोप करुणा शर्मा यांनी केला. त्या म्हणाल्या की, "धनंजय मुंडे यांच्याकडे एवढे डोकं नाही. त्यांच्या आजूबाजूच्या दलाल लोकांनी हे कटकारस्थान रचलं आहे. त्यातला एक आका जेलमध्ये गेला आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात बोलू नकोस नाही तर तुझ्या मुलीला उचलून घेऊन जाऊ अशा धमक्या आल्या आहेत. याचे सगळे पुरावे मी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे दिले आहेत."
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून कंटाळले
करुणा शर्मा म्हणाल्या की, "मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करून मी आता कंटाळले आहे. त्यांच्याकडे सर्व पुरावे देण्यासाठी निवेदन दिलं होतं. त्यांनी मला वेळच दिली नाही. गेल्या तीन वर्षांपासून मुख्यमंत्र्यांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही. एका मंत्र्याच्या बायकोला जर महाराष्ट्रात न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांना काय न्याय देणार?"























