करमाळा : कोरोनाच्या धोक्यामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण असताना आता करमाळ्यात जामा मशिदीतून नागरिकांना कोरोनापासून संरक्षणासाठी जनजागृतीचा सुरुवात करण्यात आली आहे. दिवसभरातील पाच वेळा होणाऱ्या नमाजानंतर कोरोनासंदर्भात घ्यायच्या खबरदारी आणि नागरिकांची कर्तव्ये याची माहिती वारंवार स्पीकरवरून देण्यात सुरुवात झाल्याने मुस्लिम समाजासोबत करमाळावासीयांचे यामुळे रस्त्यावर मोकाट फिरण्यावर आळा बसला आहे.


करमाळ्यात मुस्लिम समाजाने कोरोनाबाधितांसाठी विविध प्रकारची भरीव मदत केली असून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य वाटप सुरु ठेवले आहे. अशातच रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांवर अजूनही नियंत्रण येत नसल्याने जामा मशिदीतून देण्यात येणाऱ्या सूचना आणि धोक्याच्या इशाऱ्यामुळे आता करमाळ्यात रस्त्यावरील वाहतूक कमी होऊ लागली आहे.


करमाळा येथील जामा मशिदीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना आपल्या घरामध्ये नमाज पठण करण्याबरोबरच आताच्या परिस्थितीत आपण कशाप्रकारे जबाबदारी पार पाडली पाहिजे याविषयी आवाहन केले जात आहे.


गेल्या दहा ते बारा दिवसांपासून जामा मशीदीमध्ये दिवसातून पाच वेळा अजानच्या वेळी शहरातील सर्व नागरिकांना स्पीकरवरून कोरोनाचा धोका पाहता घराबाहेर पडू नका, नमाज पठनासाठी मशिदीमध्ये येऊ नका, आपापल्या  घरीच नमाज पठण करा असे संदेश देण्यात येत आहे.


जामा मशिदीचे विश्वस्त कासम सय्यद, उस्मान सय्यद,जमीर सय्यद, मौलाना मोहसिन हे सामजिक सलोखा कायम राहावा यासाठी उपक्रम रावबत आहेत. जामा मशिदीच्या या उपक्रमानांतर आता  सर्व धार्मिक स्थळांनी याचा आदर्श घेतल्यास सध्याच्या आणीबाणीच्या काळात प्रशासनाला मोठी मदत होणार आहे.