बीड/अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिटलर बनण्याचं स्वप्न पाहू नये. तुम्ही ना हिटलर आहात, ना आम्ही गॅस चेंबरमधील यहुदी. आम्ही लढून मरु, पण झुकणार नाही, असा घणाघात विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याने अहमदनगरमध्ये केला. यावेळी कन्हैय्याने पंतप्रधान मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार टीका केली.
अहमदनगरमध्ये तुफान गर्दीसमोर झंझावती भाषण
“नरेंद्र मोदी पंतप्रधान नसून अंबानी आणि अदानीचे प्रचार मंत्री आहेत. नीता अंबानींबरोबर फोटो काढतात तर जाहिरात का नाही करणार?”, असा सवाल कन्हैया कुमारने केला. “पंतप्रधान सरकारी कंपनीची जाहिरात करत नाहीत. मात्र खासगी कंपनीचा प्रचार करतात”, असा आरोप कन्हैयाने केला. अहमदनगर लाँग मार्चच्या सभेत तो बोलत होता.
यावेळी कन्हैयाने आरएसएसच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला. देशभक्तीचा नारा देणाऱ्या संघाच्या किती जणांनी स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलंय?, असा सवाल कन्हैय्याने केला. शिवाय, भगव्या दहशतवादाविरोधात सर्वांनी इंद्रधनुष्यासारखं एकत्रित लढण्याचं अवाहनही कन्हैय्याने केलं.
“पंतप्रधानांनी अच्छे दिनची घोषणा केली. मात्र, इंधन, भाजीपाल्याची महागाई वाढली. नोटाबंदीने शंभरपेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला. पंधरा लाख नागरिकांचा रोजगार गेला. तर दुसरीकडे पंधरा लाख खात्यात आलेच नाही. नोटाबंदीनं नक्षलवाद, दहशतवाद संपला नाही.”, असेही कन्हैय्या म्हणाला.
“पंतप्रधानांनी 'सबका साथ सबका विकास'ची घोषणाबाजी केली. मात्र दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. पण खासगी पीक विमा कंपनीला दहा हजार कोटींचा फायदा झाला.”, असा दावाही कन्हैय्याने केला.
बीडमध्येही कन्हैय्याचा सरकारवर हल्लाबोल
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी कन्याकुमारी येथून 15 जुलैपासून देशव्यापी जनजागरण संघर्ष यात्रा सुरू केली आहे. तेलंगणा राज्यातून सुरु झालेली यात्रा बीडला दाखल झाली. याच पार्शवभूमीवर संविधान बचाव लॉंग मार्च आणि रोहित अॅक्ट परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने आरएसएस आणि मोदींवर हल्लाबोल केला.
“मी मोदीचा दुष्मन नाही. माझी लढाई संघाच्या विचारांच्या विरोधात आहे. हा लॉंग मार्च नसून एका युद्धाची सुरुवात आहे.”, असे म्हणत कन्हैय्याने मोदींची तुलना हिटलरबरोबर केली.
दरम्यान, या परिषदेत जातीअंताची उतरंड फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, तर शेतकऱ्यांना छळणाऱ्या सरकारवर आसूड उगारुन निषेध देखील करण्यात आला. दरम्यान, कन्हैयाच्या सभेला मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली.