ठाणे : साखरपुड्याच्या कार्यक्रमात फटाक्यांच्या आतिषबाजीने रंगाचा बेरंग झालाय. फटाक्यांच्या आतिषबाजीने शेतातील सुकलेल्या रान गवताला आग लागली. या आगीत साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांची चार चाकी वाहने जळून खाक झाली आहेत. ही घटना कल्याण तालुक्यातील सांगोडा गावात घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलिस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या आगीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कल्याण तालुक्यातील टिटवाळ्या नजीक सांगोडा हे गाव आहे. या गावातील एका कुटूंबाकडे 20 फ्रेबुवारी रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी या पेटलेल्या फटाक्यांच्या ठिणग्या जवळच असलेल्या सुक्या गवतावर पडल्या आणि गवताने पेट घेतला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आग लागली होती त्या ठिकाणी साखरपुड्याला आलेल्या मंडळींची चार चाकी वहाने उभी केली होती. दुसरीकडे गवताची आग झपाट्याने पसरली. या आगीने क्षणात रौद्ररुप धारण केल्याने गावकऱ्यांची एकच गोंधळ उडून धावपळ उडाली होती. सुक्या गवताच्या आगीच्या वनव्याने तेथील चारचाकी वाहनांनी पेट घेतला. यावेळी एका चारचाकी वाहनात स्फोट झाला आणि आजूबाजूच्या गाड्यांना आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नाही. परंतु, चार ते पाच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनास्थळी एकच गोंधळ
दरम्यान, गवताने पेट घेतल्यानंतर ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली. आग लागल्याचे समजताच कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. काही तरुण मंडळींनी सुरुवातीला झाडाच्या झावळ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्याने पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. तोपर्यंत या आगीची झळ तेथे उभ्या केलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांना बसली होती. या वाहनांचे जळून मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कल्याण ग्रामीण तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत आगीच्या घटनेचा तपास सुरु केला आहे.
गवताने पेट घेतल्याने आग भडकली
कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या जागेत वाळलेलं गवत होतं. याच जागेत फटाके फोडण्यात आले. त्यामुळे वाळलेल्या गवताने काही क्षणात पेट घेतला. आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, गवताने पेट घेतल्याने ही आग भडकली.
महत्वाच्या बातम्या