Kalyan Dombivli Municipal Corporation : गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आणि नकाशे आज जाहीर करण्यात आले आहेत. केडीएमसी मुख्यालयात या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याने त्या पाहण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे विद्यमान नगरसेवकांसह अनेक इच्छुकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
मागील दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले. यंदा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने होणार आहे. महापालिकेतील 27 गावापैकी 18 गावे वगळून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र प्रभाग रचना करताना या 18 गावांसह करण्यात आली आहे. यंदा 11 प्रभाग वाढल्याने 133 प्रभाग असणार आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला.
महापालिका मुख्यालय, प्रभाग क्षेत्र कार्यालयासह पालिकेच्या अधिकृत संकेत स्थळावर हा आराखडा नागरिकांना पाहता येणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची ऐकून लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 इतकी गृहीत धरून प्रभाग रचना करण्यात आली आहे.आज जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत एकूण 133 प्रभाग असून 44 पॅनलमध्ये ते विभागण्यात आले आहेत. तर 44 पैकी पहिले 43 पॅनलमध्ये 3 उमेदवार तर शेवटच्या म्हणजेच 44 व्या पॅनेलमध्ये 4 उमेदवार असणार आहेत. ही प्रभाग रचना www.kdmcelection.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर आज जाहीर झालेल्या या प्रारूप वॉर्ड रचनेबाबत हरकती नोंदवण्यासाठी 14 फेब्रुवारीपर्यंतचा 2 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यासाठी केडीएमसी मुख्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी प्राप्त होणाऱ्या हरकतींवर निवडणूक आयोग सुनावणी घेऊन 26 फेब्रुवारी रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार ,762अनुसूचित जाती : 1 लाख 50 हजार 171अनुसूचित जमाती : 42 हजार 584एकूण सदस्य : 133 महिला : 67अनुसूचित जाती : 13 ,महिला : 07अनुसूचित जमाती : 04 ,महिला : 02सर्वसाधारण 116, महिला 583 सदस्यांचे 43 प्रभाग सरासरी लोकसंख्या 34,2584 सदस्यांचा 1 प्रभाग सरासरी लोकसंख्या 45 हजार 677
दरम्यान प्रभाग रचनेची प्रारूप यादी जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. प्रभाग रचना पाहण्यासाठी माजी सदस्य, इच्छुक सदस्यांची धावपळ सुरू झाली मात्र पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात असल्याने तारंबळ उडाल्याचे दिसून आले. निवडणुका होणार हे निश्चित झाले असून निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी निवडणुका एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे.