पुणे : काल कुणाला 100 टक्के पडले म्हणून जास्त आनंद झाला असेल, तर कुणाला अपेक्षित गुण मिळाले नाहीत, म्हणून निराशा आली असेल. पण यश-अपयश आलेल्या दोघांनीही पुण्याच्या काजल जाधवकडे पाहावं. दोन वेळच्या जेवणासाठी डोंबाऱ्याचे खेळ करणाऱ्या या मुलीनं दहावीची परीक्षा पार केली आहे. आणि तिला आता शिक्षिका होऊन तिच्यासारख्याच जिद्दी पिढ्या घडवायची इच्छा आहे.

काजल जाधव ही पुण्याच्या वैदूवाडीत राहणारी. कालपासून तिच्या या पत्र्याच्या घरातून आनंद आणि समाधान ओसंडून वाहतं आहे. कारण काजल घरातली पहिली मुलगी आहे जिनं दहावीचा टप्पा ओलांडला आहे.

काजलला फक्त 47 टक्के गुण मिळाले आहेत. पण ते 100 टक्क्यांवरही भारी आहेत. कारण काजल अवघ्या काही महिन्यांची असताना तिची आई तिला डोंबाऱ्याचं काम करणाऱ्या कमलाबाईंकडे सोडून गेली.

कमलाबाईंचं कुटुंब डोंबाऱ्याचं काम करत होतं. काजलही ते काम शिकली. उन्हापावसात खेळ करायचे, लोकांसमोर हात पसरायचे. दोन वेळच्या भाकरीसाठी कष्ट उपसायचे हा दिनक्रम होता. पण त्याच दरम्यान गुरुकलचे गिरीश प्रभुणे भेटले, आणि काजलचं आयुष्य बदललं.

कधीही शाळेचं तोंड न पाहिलेली काजल शाळेत आली आणि मग तिनं मागे वळून पाहिलं नाही.

दरम्यान कमलाबाईंचं वय झालं. डोंबारीकाम होईनासं झालं. त्यामुळे दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काजलला डोंबारीकाम करावं लागायचं. लोकांसमोर हात पसरावे लागायचे.

कमलाबाईंची माणुसकी आणि माया आभाळाएवढी आहे. काजलचा संघर्ष अफाट आहे. त्यापुढे भाषेतली सगळी विशेषणं ठेंगणी, खुजी आहेत. त्यामुळे फार काही लिहिणं शुद्ध मूर्खपणाच. फक्त एक आहे, कधी निराशा आली, कधी कोसळून व्हायला झालं, तर काजलला डोळ्यासमोर आणा. आयुष्य सोपं होईल!!!