Nashik MHADA lottery : नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या हक्काचं घर मिळावं यासाठी वाट पाहणाऱ्या नाशिककरांना आता म्हाडा एक संधी देत आहे. याबाबत खुद्द राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी माहिती दिली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, नाशिकमध्ये 2013 ते 2022 पर्यंत 157 घरे म्हाडाला मिळाली होती. ह्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे असे माझ्या लक्षात येताच चौकशी सुरु केली. आजमितीपर्यंत 2031 घरे म्हाडाला प्राप्त झाली आहेत. त्याची सोडत व लॉटरी मे आणि जून महिन्यात करण्यात येणार आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.


नाशिकमध्ये जवळ जवळ 5000 घरे मिळतील असा अंदाज आहे. माझे गाव असल्या कारणाने मी स्वतः तिथे येऊन लॉटरी काढणार आहे. घोटाळा होता हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे, असं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.






यासंदर्भात एबीपी माझाशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, नाशिककरांसाठी आज आनंदची बातमी आहे. 5 हजार घरं दिली जातील.


भोंगा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयचा पालन केले पाहिजे- आव्हाड 
भोंग्याच्या वादावर बोलताना  जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भोंगा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयचा पालन केले पाहिजे. भोंगा फक्त दंगलींसाठी वाजविला जात आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील जहागीरपुरीबाबत निर्णय दिला. पण तेथील अधिकाऱ्याने सांगितले की अधिकृतपणे आदेश आला नाही. ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली आहे. देशात पहिल्यांदा असे पाहायला मिळाले आहे. अराजकता सर्व पक्षाला धोक्याची आहे.