मुंबई : महाराष्ट्राला मला सांगावसं वाटतं की कागल मतदारसंघात एकेकाळी शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत निकटवर्तीय सदाशिव मंडलिक हे निवडून येत होते. त्यानंतर विरोध असताना 98% समाज मराठा, धनगर, माळी आणि इतर समाज असताना मुस्लिम समाजाचा उमेदवार म्हणून हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या नावाने दिला आणि शरद पवार यांनी त्यांना चार-पाच वेळा निवडून आणलं, तेव्हा हे कधीच बोलले नाहीत की मी शरद पवारांच्या पुण्याईने निवडून आलो.
तुम्ही आता शरद पवारांची साथ सोडली, त्यामुळे शरद पवार आता तिथे उमेदवार देणारच ना? ज्या माणसाने तुम्हाला एका बहुसंख्यांक मतदार संघातून तुम्हाला निवडून आणलं, तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही? शरद पवारांचा त्यात मोठेपणा नव्हता का? असा सवाल करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी हसन मुश्रीफ यांना केला आहे.
मात्र तुम्ही शरद पवार साहेबांना एकटं सोडून गेलात- जितेंद्र आव्हाड
ज्या पद्धतीने शरद पवारांवरती टीका टिप्पणी होत होती, तेव्हा तुमचं बोलण्याचं धाडस झालं नाही. त्यावेळी जर तुम्ही शरद पवारांच्या बाजूने बोलला असतात तर एक वेळ तुमच्याबद्दल त्यांच्या हृदयातलं प्रेम वाढलं असतं, हे सगळं घडत असताना तुम्ही मात्र शरद पवार साहेबांना एकटं सोडून गेलात. तुम्ही विचार करा आणि महाराष्ट्र देखील विचार करेल की बहुसंख्यांक समाज तिथे असताना तुमच्यासारख्या एका मुस्लिम उमेदवाराला पवार साहेब तिकडून निवडून आणायचे, तेही मोठ्या फरकाने हे तुम्ही कसं काय विसरलात?
तुम्ही जर पवार साहेबांचा घातच केला आहे तर ते तरी तुमचा विचार कशाला करतील, ते त्यांची राजकीय खेळी खेळणार असल्याचेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. तुम्ही अल्पसंख्यांक आहात म्हणून तुमच्या मागे लागणं यात काहीच अर्थ नाही. तो मतदारसंघ अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांकवर नाही तर तो मतदारसंघ शरद पवारांना मानणारा आहे, आणि शरद पवार सांगतील तो उमेदवार निवडून आणणारा आहे.
मी मुसलमान असल्याची आज अचानक तुम्हाला आठवण झाली?
तुम्हाला एवढंच जर प्रेम होतं तर परवा ट्रेनमध्ये एका म्हाताऱ्या मुसलमानाला मारण्यात आलं, तेव्हा तुम्ही का नाही बोललात? देशभरात मुसलमानांना मारत आहेत, गोळ्या घालत आहेत, त्यावर तुम्ही का बरं बोलत नाहीत? तुमच्याच युतीतले आमदार मुसलमानांना मशिदीत घुसून गोळ्या मारिन, असं म्हणतात तेव्हा तुम्ही साधा निषेदाचा शब्द सुद्धा काढलेला नाही. ना तुमच्या पक्ष नेतृत्वाने काढला. आता अचानक तुम्हाला आठवण झाली की मी मुसलमान आहे आणि म्हणून मला विरोध होतोय, म्हणून शरद पवार माझ्या मागे लागलेत. शरद पवार जात-पात, प्रांत यापुढे जाऊन राजकारण करतात. मी अशा महाराष्ट्रातील अनेक जागा दाखवील जिथे समाज एक टक्का असताना त्याला उमेदवारी देऊन निवडून आणलेला आहे, तुम्ही हा त्यांच्या मोठेपणाचा विचार करायला हवा होता. मुसलमानांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हसन मुश्रीफ एकदा बोलले असं त्यांनी दाखवाव.
विशालगडावर हल्ला झाला तेव्हा तुम्ही का भूमिका घेतली नाही, जेव्हा मस्जिद तोडण्यात आली,गजापूरमध्ये जेव्हा कुरण फाडण्यात आली तेव्हा तुम्ही कुठे होतात? रंग बदलू नका, तुम्ही मुस्लिम आहात हे मान्य आहे. पण शरद पवारांना यात खेचू नका, तुम्हाला पाडण्यासाठी तुम्ही जर शरद पवारांना चिमटा काढलाय तर त्याचं प्रत्युत्तर ते देणार ना, का नाही द्यायचं त्यांनी आम्ही त्यांना सांगू की द्या. काय दिलं नाही तुम्हाला शरद पवारांनी, कोल्हापूर सारख्या जिल्ह्याचा पालकमंत्री केलं तुम्हाला , तेव्हा तुम्ही विचार नाही केला? हा नाटकीपणा आणि हे ढोंग बंद करा, तुमच्या या ढोंगीपनाला फार किंमत कोल्हापुरात मिळणार नाही आणि कागल मध्येपण मिळणार नाही, असा घणाघातही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
हे ही वाचा