Jitendra Awhad : मला जे कोणी बोलतात त्यांचा मी विचारही करत नाही. त्याबद्दल मी फार गांभीर्यानेही घेत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (देशमुख हत्या प्रकरण (Jitendra Awhad) यांनी नाव न घेता आमदार सुरेश धस यांच्यावर केली. मोर्चा मोर्चा करतात, यांच्या सरकार समोर लाखो मराठ्यांचे मोर्चे निघाले, काय न्याय दिला यांनी मराठा समाजाला? असा सवाल देखील आव्हाड यांनी केला. सरकारला कुठेतरी जरांगेंना बाजूला करायचं आहे. त्याच्यासाठी कोणालातरी मोठं करायचं हे सरकारचं काम आहे असेही आव्हाड म्हणाले. मी काय माना हलवत नाचत येत नाही, असा टोला देखील जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धसांना लगावला.
तुम्ही मला मीडियाची स्पेस सांगता, तुम्हाला जेव्हा मीडियाचा एम माहित नव्हता तेव्हापासून मी मीडियामध्ये येतोय. मला टीव्ही बद्दल काही सांगू नका, मी काय मान हलवत नाचत येत नाही (धस यांची नाचायची नक्कल करुन ) मी स्ट्रेट येतो असा टोला आव्हाडांनी धसांना लगावला. मी कुठेही बाईचं नाव घेऊन, काही तरी वैयक्तिक प्रकरण काढणं मला अजिबात आवडत नाही. मी जे बोलतो तो माझा मुद्दा असतो, प्रामाणिक असतो आणि विचारांनी प्रेरणात्मक असतो असेही आव्हाड म्हणाले. माझं स्पष्ट मत होतं की अक्षय शिंदे, सोमनाथ सूर्यवंशी हे मागासवर्गीय यांना न्याय देण्यासाठी आम्ही मोर्चे काढायचे असे आव्हाड म्हणाले.
कोणाला उत्तर द्यायला मी बांधील नाही
पहिली गोष्ट कोणाला उत्तर द्यायला मी बांधील नाही, कोणाच्या सुपाऱ्या घेऊन स्वतःचा राजकीय स्कोर सेटल करायला काम करत नाही असेही आव्हाड म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने उत्तर दिलं ते स्पष्ट उत्तर होतं. महाराष्ट्राच्या माऊलीचे उत्तर होतं पोटचा गोळा गेल्यानंतर तिच्या मनातल्या वेदना तिने बोलून दाखवल्या आहेत. जी माणसं बोलत होती की जाऊ द्या सोडून द्या ना त्या माऊलीने बरोबर त्यांना उत्तर दिल्याचे आव्हाड म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणारच नाही, कशाला घेतील? असा सवाल आव्हाड यांनी केला. कोर्टाने सांगून पण सरकार अक्षय शिंदे च्या प्रकरणात गुन्हा नोंदवायला तयार नाही असेही आव्हाड म्हणाले. लहान समाजाच्या लहान माणसांवर दबाव टाकणं खूप सोपं असतं, त्यांच्यावर राजकीय,आर्थिक, सामाजिक दबाव टाकता येतो, त्यांची आर्थिक कोंडी करता येते त्यांना घाबरवता येतं म्हणून अशातच हे छोटे समाज माघार घेतात असेही आव्हाड म्हणाले. अक्षय शिंदे गुन्हेगार आहे, त्याला फाशीची शिक्षा झाली असती पण तुम्ही शिक्षा देणारे कोण? असा सवाल आव्हाडांनी केला. पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आहेत कायदा हातात घेण्यासाठी नाहीत असेही आव्हाड म्हणाले.