मुंबई : भाकरी फिरवणं हा शरद पवारांकडून अनेकदा वापरला जाणारा शब्द. पक्षाच्या वर्धापनदिनाचं निमित्त साधत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाकरी फिरवण्याची गरज व्यक्त केली. ही भाकरी फिरवण्याची सुरुवात आपल्यापासून व्हावी, अशी भूमिका घेत त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचीही जाहीरपणे मागणी केली. आता राष्ट्रवादीत खरोखरच भाकरी फिरणार का आणि फिरलेल्या भाकरीचे परिणाम काय होणार याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत काही ठोस विधानं नेत्यांकडून होतात का, याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वेगळाच धक्का दिला. गेल्या सात वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची इच्छा जाहीर व्यासपीठावरून बोलून दाखवली आणि कार्यकर्त्यांनी एकच गलका केला.
Jayant Patil News : जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे. मी यानिमित्त एवढीच साहेबांना विनंती करेन की... शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यांनी याविषयी त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असं जयंत पाटील म्हणाले.
Sharad Pawar Speech : शरद पवारांनी उत्सुकता कायम ठेवली
प्रदेशाध्यक्षांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची केलेली मागणी पक्षाध्यक्ष शरद पवारांनीही उचलून धरली. जयंत पाटलांच्या या मागणीमागे उभं राहण्याचं आवाहनदेखील कार्यकर्त्यांना केलं. तालुका स्तरावर नवे चेहरे दिसलेच पाहिजे असा आग्रह पवारांनी धऱला खरा. मात्र वरच्या फळीत नवे चेहरे दिसणार की नाही, याविषयीची उत्सुकता कायम ठेवली.
शरद पवार म्हणाले की, "जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे नव्या चेहऱ्यांना संधी द्या. तुम्ही-आम्ही सगळे त्यांच्यामागे उभे राहूया. आज त्यांची तयारी आहे. तुमची मानसिकता वेगळी आहे हे कळलं. प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊन सुसंवाद साधू आणि एकत्रित निर्णय घेऊ. प्रत्येक तालुक्यात नवे चेहरे दिसलेच पाहिजे."
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही. मात्र नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची इच्छा व्यक्त केली. तर त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी रोहित पवार विशेष आशावादी असल्याचं दिसलं.
रोहित पवार म्हणाले की, "जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाचे सात ते आठ वर्षे नेतृत्व केलं. आता एक पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला संधी देतील. ते शरद पवार आणि वरिष्ठ नेते ठरवतील. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी आता मार्गदर्शन करावे. पक्षातील एका एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळेल."
Jayant Patil Speech : जयंत पाटील चाणाक्ष नेते
राष्ट्रवादीच्या काही जुण्याजाणत्या नेत्यांना जयंत पाटलांचा चाणाक्षपणा दिसला. त्यांच्या भाषणातील वक्तव्यामागचा खरा उद्देश अजित पवारांच्या पक्षाच्या अनिल पाटलांनी समजावून सांगितला. ते म्हणाले की, जयंत पाटील हे हुशार आणि चाणाक्ष असलेले नेते आहेत. त्यांचं कर्तृत्वही मोठं आहे. ज्यावेळी एखाद्याला वाटतं की खुर्ची जाऊ शकते, ते खुंटा हलवून माती मजबूत करण्याचं काम जयंत पाटलांनी केलं. भाषणात सांगून त्यांनी खुंटा बळकट करण्याचं काम त्यांनी केलं.
एकीकडं स्वपक्षीयांकडून जयंत पाटील यांना असे टोमणे मारले जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीदेखील त्यांना चिमटा घेतला. सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा, असं जयंत पाटील म्हणत असतील, तर त्यांच्या मनात काय सुरु आहे, ते पाहावं लागेल असं फडणवीस म्हणाले.
NCP Vardhapan Din : योग्य वेळी योग्य निर्णय
या टीकेला पार्श्वभूमी होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेची. यानिमित्तानं नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनातील जयंत पाटलांच्या वाक्याची पुन्हा एकदा सर्वांना आठवण आली. 'आमच्या पक्षाचं एक महत्त्वाचं वाक्य आहे. योग्य वेळी योग्य निर्णय' असं जयंत पाटील म्हणाले होते.
या सगळ्या क्रिया-प्रतिक्रियांनंतर जेव्हा माध्यमांनी जयंत पाटलांना त्यांच्या भूमिकेबाबत विचारलं. तेव्हा चेहऱ्यावर मिश्कील भाव आणत त्यांनी योग्य निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जयंत पाटील म्हणाले की, "असं आहे की साहेब आमचे सर्वोच्च नेते आहेत. ते पुढचा निर्णय करतील. त्यांनी सांगितलं सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा करू. राजीनामा देणार नव्हतो. ही व्यवस्था आहे त्यात नव्या पिढीचे लोक आले पाहिजेत. मी गेले सात वर्षं हे काम करतोय. साहेबांना आणखी वेगळा विचार करायला मुभा दिली पाहिजे. ते योग्य त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतील."
नव्या चेहऱ्याला संधी मिळणार का?
थोडक्यात राजीनामा न देता 'नव्या चेहऱ्यांना' संधी देण्याची मागणी जयंत पाटलांनी केली. शिवाय शरद पवार 'योग्य निर्णय' घेतील, अशी खात्रीही व्यक्त केली. दुसरीकडं शरद पवारांनीही 'योग्य निर्णय' घेणार असल्याचं म्हटलंय. तेदेखील सर्वांशी सुसंवाद साधून. नव्या चेहऱ्यांना 'संधी देणारा' आणि जुन्या चेहऱ्यांचं 'समाधान करणारा' असा कुठला निर्णय शरद पवार घेणार याचीच सध्या दोन्ही राष्ट्रवादीत चर्चा सुरु आहे.