नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारेंचे पाया पडून विधानसभा निवडणूक होईपर्यंत वेळ काढून घेतली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. काल उपोषणस्थळी जाऊन मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्या पूर्ण करण्याचं अश्वासन दिलं होतं. त्यानंतर अण्णांनी उपोषण मागे घेतलं होतं.

लोकपाल नियुक्ती आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव यांसारख्या अनेक मागण्यासाठी अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसले होते. उपोषणाच्या सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अण्णांनी उपोषण मागे घेतले. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी अण्णांचे पाया पडून निवडणुकांपर्यंत वेळ काढून घेतली असल्याचा आरोप केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काही मुद्द्यांवर एकमत
त्यासोबतच जयंत पाटील यांनी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या महाआघाडीत सामिल होण्याबाबतही खुलासा केला. प्रकाश आंबेडकर आमच्याबद्दल काहीही बोलेले तरी ते आमच्यासाठी महत्वाचे नाही. भाजप-शिवसेनेला आगामी निवडणुकीत पराभूत करण्यासाठी आंबेडकरी मते एकत्र यावी, असा आमचा प्रयत्न असल्याचं जयंत पाटील म्हणाले. प्रकाश आंबेडकरांसोबत महाआघाडीबाबत चर्चा सुरु आहे. काही मुद्द्यांवर एकमत झाल्याचंही जयंत पाटील म्हणाले.

भाजपाच्या नेत्यांचा स्वत:वर अविश्वास निर्माण झाला आहे
भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी एका सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार शकूनी मामा असल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, भाजपाच्या नेत्यांचा स्वत:वर अविश्वास निर्माण झाला आहे. म्हणून भाजपचे नेते खालच्या स्तराला जाऊन टीका करत आहेत.

महाआघाडीसंदर्भात मनसेबद्दल चर्चा नाही
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे मनसे महाआघाडीत सामिल होणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र जयंत पाटील यांनी ही बाब फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादी -काँग्रेस स्तरावर मनसेबद्दल काही चर्चा नसल्याची ते म्हणाले. राज ठाकरे आणि छगन भुजबळ यांची व्यक्तीगत भेट असू शकते, असंही ते म्हणाले.