निरेच्या पाणी प्रश्नावरुन राजकारण तापलं, 50 वर्ष सत्तेत असूनही तुम्हाला का आठवलं नाही? मंत्री गोरेंचा मोहिते पाटलांवर हल्लाबोल
नीरा देवधरच्या पाण्याचा प्रश्न सुटत आलेला पाहून श्रेय लाटण्यासाठी ही मंडळी रास्ता रोकोचा फार्स करु लागली आहेत, असं म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका केली.
Jayakumar Gore on Dhairyasheel Mohite Patil : वर्षानुवर्षे सत्ता असून यांना कधी निरेच्या पाण्याचा प्रश्न दिसला नाही. मात्र आता नीरा देवधरच्या पाण्याचा प्रश्न सुटत आलेला पाहून श्रेय लाटण्यासाठी ही मंडळी रास्ता रोकोचा फार्स करु लागली आहेत, असं म्हणत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहित पाटील (Dhairyasheel Mohite Patil ) यांच्यावर सडकून टीका केली. नीरा देवधर धरणाच्या पाण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस म्हसवड रोडवर विशाल रास्ता रोको करत शासनाच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. यावर गोरे यांनी टीका केलीय.
दुष्काळी भागाला पाणी देण्याची धमक केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्येच
इतके वर्ष या भागातील जनतेने तुम्हासा भरभरुन सत्ता देऊनही तुम्ही हे का करु शकला नाही? असा सवाल जयकुमार गोरे यांनी उपस्थित केला आहे. नीरेचा पाणी प्रश्न अंतिम टप्प्यात आल्यावर केवळ श्रेय लाटण्यासाठी हा आंदोलनाचा फार्स करीत असल्याचे चोख उत्तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांना दिले आहे. दुष्काळी भागाला पाणी देण्याची धमक केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातच असून त्यांनी सातत्याने सर्व दुष्काळी भागाला पाणी मिळवून दिले असल्याचे गोरे यांनी सांगितले.
उजनी धरणातील प्रदूषित पाण्याच्या मुद्यावरुन गोरे यांची मोहिते पाटील यांच्यावर टीका
उजनी धरणातील प्रदूषित पाणी आणि पर्यटन केंद्राबाबत खासदार मोहिते पाटील हे राज्याच्या मुख्य सचिवांच्या विरोधात लोकसभेत हक्कभंग दाखल करणार असल्याच्या वक्तव्यावर बोलताना तो त्यांचा अधिकार आहे. मात्र इतकी वर्षे सत्ता असताना तुम्हाला कधी उजनीच्या पाण्याचे प्रदूषण अथवा उजनी धरणावरील पर्यटन प्रकल्पाबाबत का विचार आला नाही? असा सवाल देखील जयकुमार गोरे यांनी उपस्थित केला.
मोहिते पाटलांच्या नेतृत्वात माळशिरस म्हसवड रोडवर रास्ता रोको आंदोलन
गेल्या 45 वर्षापासून पाण्यासाठी झगडत असलेल्या दुष्काळी भागाला निरा देवधर धरणाचे पाणी तात्काळ मिळावे, या मागणीसाठी आज शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर (Uttamrao Jankar) आणि माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस म्हसवड रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलाय. या आंदोलनासाठी दुष्काळी माळशिरस (Malshiras) तालुक्यातील जवळपास पाच ते सात हजार शेतकरी उपस्थित होते. यामुळे माळशिरस ते मसवड या रस्त्यावर पूर्णपणे चक्काजाम झाल्याचे चित्र बघायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
























