जळगाव : कोरोनाने एकीकडे अनेक तरुणांचा बळी जात असताना चाळीस गाव येथील 94 वर्षीय शामसुंदर शुक्ल या माजी कुस्तीगिराने कोरोनाला आसमान दाखवले आहे. नियमित व्यायाम, सकस आहार आणि सकारात्मक विचार ठेवल्याने हे शक्य असल्याचं शामसुंदर शुक्ल यांनी म्हटल आहे. चाळीस गाव येथील शुक्ला परिवारात मागील पंधरा दिवसांच्या पूर्वी तब्बल आठ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये शामसुंदर शुक्ला यांचाही समावेश होता. एकाच वेळी इतक्या जणांना लागण झाल्याने सुरुवातीला घरात भीतीच वातावरण पाहायला मिळाले होते. मात्र, कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य असलेल्या शामसुंदर शुक्ला यांनी सगळ्यांना धीर दिला आणि संयम ढळू दिला नाही आणि त्यांचा सकारात्मक परिणाम म्हणून शुक्ला परिवारातील सर्व आठही सदस्य घरच्या घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने बरे झाले आहेत. शामसुंदर शुक्ला हे चाळीसगाव शहरात स्टेशन रोड परिसरात राहतात. बालपणापासून शेतीचा व्यवसाय असल्याने कष्टाच्या कामाची त्यांना सवय आहे. याशिवाय कुस्तीचीही त्यांना अवड असल्याने त्यांनी अनेक आखाडे जिंकले आहेत. कुस्तीसाठी नियमित व्यायाम आणि सकस आहाराची त्यांना आजही सवय असल्याने कोरोनवर मात करताना त्यांना या सर्व गोष्टींचा फायदा झाला आहे.
रोज दहा तर बारा किलोमीटर चालण्याचा व्यायाम, त्याला जोड म्हणून फळे, दूध आणि सुकामेवा खाण्याची त्यांना सवय आहे. कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी त्यांना मांसाहार करण्याचं सांगितलं होतं. मात्र, सुरुवातीपासूनच शाकाहारी असल्याने आताही आपण शाकाहार घेणार असल्याची शामसुंदर यांची भूमिका होती. यासाठी त्यांनी हळदीचे दूध, चांगल्या तूपातील शिरा, उपमा आणि फळे असा आपला आहार कायम ठेवला. नेहमीच हसतमुख आणि सकारात्मक विचार असलेले शामसुंदर यांनी कोरोनाच्या काळात कधीही स्वतःला भीती वाटू दिली नाही की कुटुंबाला वाटू दिली नाही. त्याचाच परिणाम म्हणून शामसुंदर शुक्ला आणि परिवाराला ना रेमडेसिवीर लागले, ना ऑक्सिजनची गरज पडली.
नियमित व्यायाम आणि शासन निर्देशांचे पालन करा तुम्ही कोरॉनावर मात देऊ शकतात, असा सल्ला शामसुंदर शुक्ला यांनी दिला आहे. शामसुंदर यांनी कोरोनाच्या विरोधात ज्या पद्धतीने लढा दिला आहे, तो पाहता त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आता बाधित रुग्णांना त्यांचं उदाहरण देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत.