Bhandara News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) महत्त्वाकांक्षी योजना 'हर घर नल, हर घर जल' (Jal Jeevan Mission) घोषणा मोठी, गाजावाजाही मोठा! पण भंडारा जिल्ह्यात या योजनेचा पुरता बोजवारा उडालाय. तुमसर तालुक्यातील हरदोली (Hardoli),-सिहोरा गावात या योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. जलकुंभ तयार करण्यात आला. गावात सुमारे 500 घरात नळ जोडणी केली. पण ते फक्त शोभेची वस्तू बनलेत. गेल्या 3 वर्षांपासून या नळांमधून पाण्याचा एक थेंबही आलेला नाही. प्रशासकीय अनास्था आणि तांत्रिक दोषांमुळे महिलांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागतेय.
Bhandara News : पुन्हा 28 लाखांचा वाढीव निधी मंजूर, जनतेच्या पैशांची ही निव्वळ उधळपट्टीच?
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील हरदोली-सिहोरा हे अडीच हजार लोकसंख्येचं गाव. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावात पाण्याची टाकी उभारली गेली, 500 घरांना नळ जोडणीही देण्यात आली. गावकऱ्यांना वाटलं आता डोक्यावरचा हंडा उतरेल, पण झालं उलटंच! तांत्रिक दोषांच्या नावाखाली ही योजना गेल्या 3 वर्षांपासून धूळ खात पडली आहे. शोकांतिका अशी की, 3 वर्ष उलटूनही या टाकीत पाण्याचा एक थेंबही चढलेला नाही. घरासमोर नळ आहेत, पण त्यात पाणी नाही. 'नळ आले, पण जल गेलं' अशी अवस्था इथल्या ग्रामस्थांची झाली आहे. प्रशासकीय ढिसाळ कारभार इतका की, चुकीच्या तांत्रिक नियोजनामुळे योजना रखडली आणि आता पुन्हा 28 लाखांचा वाढीव निधी मंजूर झालाय. म्हणजे जनतेच्या पैशांची ही निव्वळ उधळपट्टीच म्हणावी लागेल. यावर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हितेश खोब्रागडे यांना विचारलं असता, त्यांनी कॅमेऱ्यासमोर 'बाईट' देण्यास स्पष्ट नकार दिला. साहेब बोलण्यास तयार नाहीत, पण लोकं मात्र तहानलेली आहेत.
Bhandara News : नळ लावून 3 वर्ष झाली, पण पाणी कधी पाहिलंच नाही, फक्त पाईप लावून काय करायचं?
नळ लावून 3 वर्ष झाली, पण पाणी कधी पाहिलंच नाही. फक्त पाईप लावून काय करायचं? आजही विहिरीवर आणि हातपंपावर रांगा लावाव्या लागतात. प्रशासनाला आमची दया येत नाही का? असा प्रश्न आता महिला विचारत आहेत. आता प्रश्न हा निर्माण होतो की, चुकीच्या तांत्रिक नियोजनाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार का? की 28 लाखांचा हा नवा निधीही असाच वाहून जाणार? हरदोलीच्या या तहानलेल्या जनतेला न्याय कधी मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
