Jaljeevan Mission: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वकांक्षी प्रकल्प समजल्या जाणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामात तब्बल 600 कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. RTI कार्यकर्ते स्वप्नील खैर यांच्या तक्रारीनंतर आता प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. आता रत्नागिरीत जलजीवन मिशनच्या योजनेतील कामाची चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी 4 सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. (Ratnagiri) ग्रामीण भागातील सर्व घरांमध्ये वैयक्तिक घरगुती नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन मिशन राबवण्यात येत आहे.  (Jaljeevan Mission)

जलजीवनच्या कामात भ्रष्टाचार?

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेत तब्बल 600 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या आरोपांमुळे जिल्हा प्रशासन हादरलं असून, तात्काळ चौकशी सुरू करण्यात आली आहे.RTI कार्यकर्ते स्वप्नील खैर यांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने चौकशीचा निर्णय घेतला असून, यासाठी 4 सदस्यांची विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत संजय दिपकर (उप अभियंता), प्रवीण म्हात्रे (सेवानिवृत्त उपअभियंता), चंद्रसेन गीदे (लेखाधिकारी), दिनेश पोळ (उपलेखापाल) यांचा समावेश आहे. या समितीचे सदस्य 15 आणि 16 एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्हा परिषदेत उपस्थित राहून चौकशी करतील, आणि त्यानंतर सविस्तर अहवाल अभियान संचालकांकडे सादर केला जाईल. जलजीवन मिशन योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधीची उधळपट्टी झाली असून, अनेक ठिकाणी कामे कागदावरच झाल्याचा आरोप RTI तून समोर आला आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत गावागावात शुद्ध पाणी पुरवठा करण्याचं उद्दिष्ट ठेवलं जातं, मात्र प्रत्यक्षात ही योजना ठेकेदार आणि प्रशासनाच्या संगनमताने भ्रष्टाचाराचं साधन बनली असल्याचा आरोप होत आहे.या पार्श्वभूमीवर चौकशीचा अहवाल महत्त्वाचा ठरणार असून, दोषींवर कडक कारवाई होणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

वसूंधरा राजेंनी जलजीवनच्या कामावरून अधिकाऱ्यांना ठणकावले

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री व भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनीही सध्या जलजीवन मिशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने सध्या याची चांगलीच चर्चा आहे.उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या संकटामुळे लोक त्रस्त आहेत. अधिकारी समाधानी आहेत. पाणी फक्त कागदावर न जाता लोकांच्या ओठांवर पोहोचले पाहिजे. अधिकारी झोपले आहेत, लोक रडत आहेत. मी हे होऊ देणार नाही. असे म्हणत जलजीवन मिशन आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना रायपूर शहरातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येच्या तक्रारीवर त्वरित तोडगा काढण्याचे कडक निर्देश दिले. पंतप्रधानांनी जल जीवन मिशनमध्ये 42 हजार कोटी दिले आहेत. प्रत्येक पैशाचा हिशोब द्या असेही त्यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले आहे.

हेही वाचा: