पुणे, नवी मुंबई, ठाणे, नागपूरला नवीन पोलिस आयुक्त
एबीपी माझा वेब टीम | 30 Jul 2018 06:21 PM (IST)
ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे अप्पर पोलिस महासंचालकपद (कायदा आणि सुव्यवस्था) सुपूर्द करण्यात आलं आहे.
मुंबई : राज्यातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. पुणे, नवी मुंबई, ठाणे, नागपूरला नवीन पोलिस आयुक्त मिळाले आहेत. तर ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे अप्पर पोलिस महासंचालकपद (कायदा आणि सुव्यवस्था) सुपूर्द करण्यात आलं आहे. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची मुंबईच्या अप्पर पोलिस महासंचालकपदी (सामुग्री आणि तरतूद) नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रधान सचिव रजनीश शेठ यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक म्हणून वर्णी लागली आहे. मुंबईच्या नियंत्रक वैधमापन शास्त्र अप्पर पोलिस महासंचालकांची त्यांच्या जागी बदली झाली आहे. मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक विवेक फणसळकर आता ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी खांद्यावर घेतील. तर नागपूरचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम् आता पुण्याचे नवे पोलिस आयुक्त असतील. पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) प्रमुख संजय कुमार आता नवी मुंबई पोलिस आयुक्तपदाची सूत्रं हाती घेतील. पुण्याचे कारागृह निरीक्षक, अप्पर पोलिस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय आता नागपूर पोलिस आयुक्तपदी रुजू होतील. मुंबई वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक आर. के पदमनाभन् आता पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी रुजू होणार आहेत. पुण्याचे राज्य गुन्हे अभिलेख केंद्र अप्पर पोलिस महासंचालक संजीव के. सिंघल आता पुण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक म्हणून काम पाहतील.