iPhone 17 Price India: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आयफोन 17 भारतात दाखल झाल्यानंतर खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाली. मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद अशा मेट्रो शहरांमध्ये हजारोंची रांग लागली होती. मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स कंपनीच्या फ्लॅगशिप स्टोअरबाहेर हजरोंच्या गर्दीत हाणामारीचा सुद्धा प्रकार घडला. पहाटेपासून रांगा लागल्याचे दिसून आले.अॅपलने आयफोन 17 मालिकेची किंमत ₹82,900 ते ₹2,29,900 दरम्यान आहे. भारतामध्ये लेटेस्ट माॅडेलची 19 सप्टेंबरपासून प्री-बुकिंग आणि वॉक-इन असलेल्या ग्राहकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध झाली आहेत.
नाविद मुश्रीफ यांच्या व्हायरल पोस्टची चर्चा
या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या व्हायरल पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांनी दोन लाखांच्या दुभत्या गायी म्हशी बऱ्या म्हणत गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. त्यांच्या व्हायरल पोस्टमध्ये त्यांनी खरी गुंतवणूक तीच उत्पन्न देते असे म्हणत गायी म्हशी घेण्याचे आवाहन केले. आयफोन घेतल्यानंतर त्याची किंमत कमीच होतच जाते. कदाचित दोन वर्षांनी त्याची किंमत 40 हजारांनी कमी होईल. मात्र, दुभत्या गायी म्हशी त्याच किंमतीत घेतल्यास त्याची गुंतवणूक डबल होईल, असे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
अशी जाहिरात प्रत्येक दूध संस्थेत लावा
नाविद मुश्रीफ यांच्या व्हायरल पोस्टचे काहींनी कौतुक केलं आहे, तर काहींनी खोचक शब्दात टिप्पणी सुद्धा केली आहे. काहींनी तुमच्या म्हशी किती आहेत अशी विचारणा केली, तर काहींनी अशी जाहिरात प्रत्येक दूध संस्थेत लावा, अशी कमेंट केली. काहींनी तुमचा मोबाईल कोणता अशीही विचारणा केली आहे. मात्र, आयफोनसाठी लागलेली रांग, त्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊन होणाऱ्या घटना आणि ईएमआय पाहता गोकुळ अध्यक्षांची पोस्ट विशेषत: ग्रामीण भागातील तरुणांसाठी डोळ्यात अंजन घालणारी आहे. आयफोन अत्यंत महागडा असला, तरी अलीकडील काळात सर्वसामान्यांच्या हाती दिसू लागला आहे. मात्र, त्यासाठी तीन वर्ष ते पाच वर्ष हप्ते सुद्धा फेडत आहेत. हप्ते चुकल्यास दंडही अदा करत आहेत.
25 लाख लिटर संकलनाचा संकल्प
दुसरीकडे, गोकुळमध्ये 25 लाख लिटर संकलनाचा संकल्प करण्यात आला आहे. यामध्ये म्हशीच्या दूधाचा वाटा सर्वाधिक असावा यासाठी प्रयत्न सुरु आहे. चेअरमन नाविद मुश्रीफ यांनीही स्वत:हून पुढाकार घेत हरियाणामधून मुरा जातीच्या 20 उत्कृष्ट म्हशी नुकत्याच माझ्या गोठ्यात आणल्या आहेत. आधीपासूनच असलेल्या म्हशी, रेडे व रेडकांसह त्यांच्याकडे 54 हरियाणवी जनावरे आहेत. हा केवळ वैयक्तिक नाही, तर गोकुळ संघाच्या सर्व सदस्यांसाठी एक प्रेरणादायक पाऊल असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.