ठाणे : वाहनाच्या मागणीवरुन वाहन चोरी करणाऱ्या, चोरलेल्या वाहनांचे नागालँडमध्ये बनावट कागदपत्र बनवून राज्यस्थान किंवा कर्नाटकात त्या वाहनांची विक्री करणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. वाहनचोरी करणाऱ्या या टोळीला वाहनातील जीपीएस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

याप्रकरणी ठाणे पोलिसांनी जवळपास 105 गुन्हे उघडकीस आणले असून 3 कोटी 40 लाख रुपये किमतीच्या 80 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. अटक आरोपींना न्यायालयासमोर सादर नेले असता त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

ठाणे परिमंडळ 1 च्या पोलिसांनी मोटार वाहन चोरी करणाऱ्या आतंरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये संदीप मुरलीधर (मुंबई), सादिक मेहबूब खान मुल्ला ( बेळगाव, कर्नाटक), अल्ताब अब्दुलगणी गोकाक (बेळगाव, कर्नाटक), विनीत रतन माधीवाल (मुंबई), मांगीलाल शुभनाराम जाखड (नागौर, राज्यस्थान), रामप्रसाद गणपतराम इनानिया, (नागौर, राज्यस्थान), जावेद उर्फ बबलू मुख्तार खान, (प्रतापगड उत्तरप्रदेश), अल्ताब इकबाल कुरेशी (प्रतापगड, उत्तरप्रदेश), मोहम्मद युसूफ नईम खान (प्रतापगड, उत्तरप्रदेश) यांचा समावेश आहे.

रोबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 10 डिसेंबर 2018 रोजी पिकअप व्हॅन चोरीला गेली होती. त्याबाबत राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पिकअप व्हॅनला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आल्याने पोलिसांनी ती ट्रेस केली. ठाणे पोलीस पुण्यात पोहचले. ती व्हॅन एका शेतकऱ्याच्या गोदामात सापडली. पोलिसांनी शेतकऱ्यांना गाड्यांबाबत विचारले असता त्याने आरोपी विनीत रतन माधीवाल आणि संदीप मुरलीधर यांची नावं सांगितली.

पोलिसांनी विनीत रतन माधीवाल आणि संदीप मुरलीधर या दोघांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने 9 जणांना अटक केली. गेल्या सात ते आठ वर्षांपासून हे आरोपी या वाहनचोरीच्या धंद्यात सक्रिय असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

या टोळीने 170 गाड्या चोरल्याचा डेटा पोलिसांना सापडला आहे. परंतु पोलिसांना 105 गुन्हे उघडकीस आणि 80 गाड्या जप्त करण्यात यश मिळाले आहे. ही टोळी नागालँड येथे चोरीच्या गाड्यांची बनावट कागदपत्र तयार करून त्या गाड्या राज्यस्थान किंवा कर्नाटक राज्यात विकत होते. या टोळीने मागणीनुसार सार्वधिक पिकअप व्हॅन चोरल्याचे समोर आले आहे.

या गुन्ह्यासंदर्भात माहिती देण्यासाठी ठाणे पोलिसांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सह आयुक्त मधुकर पांडेय यांनी वाहन चालक आणि मालकांना आवाहन केले आहे की, वाहनांमध्ये विकसित जीपीएस तंत्रज्ञानासारख्या प्रणालीचा वापर करावा, वाहन पार्किंग करताना सीसीटीव्ही रेंजमध्ये करण्यात यावे, वाहन निर्जन स्थळी पार्किंग करू नये, वाहनामध्ये स्टेअरिंग लॉक आणि अलार्म सिस्टीम बसवावी.